आंबा, काजू, जांभूळपासून वाईननिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

गुहागर - आंबा, काजू, जांभूळ, करवंद, चिकू या फळांपासून तयार होणाऱ्या वाईनला राज्य सरकारने अबकारी करातून माफी द्यावी, असा प्रस्ताव भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी मंत्र्यांसमोर ठेवला. याबाबतची एक बैठक मंत्रालयात पार पडली. अधिवेशनानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्‍यता आहे. 

गुहागर - आंबा, काजू, जांभूळ, करवंद, चिकू या फळांपासून तयार होणाऱ्या वाईनला राज्य सरकारने अबकारी करातून माफी द्यावी, असा प्रस्ताव भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी मंत्र्यांसमोर ठेवला. याबाबतची एक बैठक मंत्रालयात पार पडली. अधिवेशनानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात द्राक्षापासून वाईन बनविण्याचे कारखाने उत्तर महाराष्ट्रात उभे राहिले. त्याचा फायदा द्राक्ष बागायदारांना झाला. सध्या पालघर जिल्ह्यातील बोर्डी परिसरात हिल झिल वाईन्स कंपनीमार्फत विकास पुजारी चिकूपासून वाईन तयार करतात. महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून वाईन बनविली जाते. आंबा व काजूपासून वाईन बनविण्याचे घरगुती प्रयोग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुरू आहेत.  

आंब्याचा भाव पडतो, काजुची बोंडे फेकावी लागतात. झाडाखाली जांभळांचा पेर पडतो. करवंद फक्त रानमेवा म्हणून विकले जाते. यापासून ज्युस, वाईन बनू शकते. त्यामुळे फळांना चांगला दर मिळेल. उद्योग उभे राहतील आणि रोजगार वाढेल. या फळांपासून बनलेल्या वाईनला बाजारपेठ मिळण्यासाठी वाईनचा दरही कमी हवा. म्हणून नातू यांनी आंबा, काजू, जांभूळ व करवंदापासून वाईन बनविणाऱ्या उद्योगाना अबकारी कर माफ करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. या संदर्भात मंत्रालयात उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आदीवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी स्ट्रॉबेरीपासून वाईन बनविणारे उद्योजक, सावर्ड येथील व्हॅली फूड फाऊंडेशनचे संचालक शेखर निकम, बोर्डी, जि. पालघर येथील चिकू वाईन बनविणारे विकास पुजारी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.  

हा उत्तम प्रस्ताव आहे. मॅंगो वाईन खूप चांगली बनते. बाजारपेठ मिळू शकते. जांभळाच्या बिया मोठ्या असतात. गर कमी मिळतो, पण उत्तम वाईन बनते. करवंद ॲसिडिक असल्याने साखर अधिक प्रमाणात लागते. राज्यात फळांपासून वाईन बनविण्यासाठी संशोधन बोर्ड स्थापन झाले तर फॉर्म्युले बनवता येतील. शेतकरी सहज वाईन बनवेल.
- सौरभ कुमार रॉय, वाईनमेकर, वाई