भटकणाऱ्या मायलेकींना खाकी वर्दीचा आधार 

परशुराम कोकणे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

सोलापूर - गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी काठी आणि शब्दांचा मारा करणाऱ्या खाकी वर्दीतल्या पोलिसांमध्येही माणुसकी जिवंत आहे याचे उदाहरण बुधवारी (ता.16) पाहायला मिळाले. आपल्या पाच लहान मुलींना घेऊन सोलापुरात भटकणाऱ्या महिलेला पोलिस उपनिरीक्षक रिया बोधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधार दिला. त्या महिलेला आणि मुलींना खायला घालून तिला गावी जाण्यासाठी बसचे तिकीट काढून दिले. 

मुलींना घेऊन सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात भटकणाऱ्या महिलेला मदत करावी, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मोहिते आणि त्यांची मैत्रीण अनू तिरनगरी पुढे आले. ते चौकशी करीत असल्याचे पाहून ती महिला घाबरली. प्रसादने चाइल्ड लाइनला संपर्क साधला. मुलींना घेऊन ती महिला रिक्षाने बसस्थानकाकडे निघाली. प्रसाद आणि अनूने त्या महिलेला नवी वेस पोलिस चौकी परिसरात अडविले. तिला चौकीत नेले. तिथे पोलिस उपनिरीक्षक रिया बोधे होत्या. त्यांनी महिलेची विचारपूस करून तिला मानसिक आधार दिला. आपण सातारा येथील रहिवासी असल्याचे त्या महिलेने सांगितले. बोधे यांनी त्या महिलेच्या मुलींना भूक लागली आहे का, असे विचारले. त्यावर निरागस मुलींनी होकारार्थी माना हलविल्या. जवळच्या हॉटेलमधून त्यांच्यासाठी जेवण मागविण्यात आले. तोपर्यंत चाइल्ड लाइनचे सदस्य आले होते; पण मुलांना सोडून जाण्यास महिला तयार नव्हती. मुलींना घेऊन गावी जाते, असे तिने सांगितले. बोधे यांनी एसटी स्थानकावर त्यांना साताऱ्याला जाणाऱ्या बसचे तिकीट काढून घरी पाठविले. 

पोलिस उपनिरीक्षक रिया बोधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेला, मुलींना खाऊ घालून त्यांना घरी जाण्यासाठी बसचे तिकीट काढून दिले. रिया बोधे यांच्या रूपाने खाकी वर्दीमधली "आई' आम्ही अनुभवली. 

- प्रसाद आणि अनू 

Web Title: The humanity is living in the police