डॉल्बीला ठोसा ढोल-ताशांचा...! 

संभाजी गंडमाळे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - डॉल्बीला ठोसा देण्यासाठी येथील तरुणाईनेच ढोल-ताशा पथकांची निर्मिती केली आहे. यंदा कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही या पथकांना गणेशोत्सवात मोठी मागणी आहे. दहाहून अधिक पथके एकट्या शहरात तयार झाली असून त्यात दोन हजारहून अधिक तरुणाई सक्रिय आहे. 

कोल्हापूर - डॉल्बीला ठोसा देण्यासाठी येथील तरुणाईनेच ढोल-ताशा पथकांची निर्मिती केली आहे. यंदा कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही या पथकांना गणेशोत्सवात मोठी मागणी आहे. दहाहून अधिक पथके एकट्या शहरात तयार झाली असून त्यात दोन हजारहून अधिक तरुणाई सक्रिय आहे. 

गेल्या दोन वर्षांत कोल्हापुरात ही संकल्पना आता चांगलीच रुजली आहे. डॉल्बीला विरोध तर आहेच; त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ढोल-ताशा पथकांकडे तरुणाई मोठ्या संख्येने आकर्षित होऊ लागली आहे. शहरातील शाहू गर्जना, करवीर नाद, करवीर गर्जना, श्रीमंत, जिजाऊ, जय महाराष्ट्र, स्वराज्य, तालब्रह्म, महालक्ष्मी प्रतिष्ठान, एकदंत आदी पथकांना मोठी मागणी आहे. आणखी काही पथकांचा सराव सुरू असून लवकरच तेही मिरवणूकीत येतील,अशी अपेक्षा आहे. 

वर्षात नवी सात पथके 
शहरातील ढोलताशा पथकांची संकल्पना आता जिल्ह्यातही चांगलीच रुजली आहे.एकट्या शहरात गेल्या वर्षभरात सात नवी पथके सुरू झाली आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील विविध गावांतून पंधराहून अधिक पथके तयार झाली आहेत. 

बर्ची नृत्याची झळाळी 
ढोल-ताशा पथकात ढोलाला साथ असते ती ताशा व झांजांची. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना सादर होत असतात. दरवर्षी एखाद्या नव्या रचनेची त्यात भरच पडत असते. अतिशय जोशपूर्ण व वीररसाने भारलेले वादन हे ढोल-ताशा पथकांचे वैशिष्ट्य; मात्र गणेशोत्सवातील अलीकडच्या काळातील बीभत्स नृत्याला पर्याय म्हणून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी ढोल-ताशा पथकाने पहिल्यांदाच बर्ची नृत्य ही संकल्पना पुढे आणली. अतिशय गतिशील असा हा नृत्य प्रकार नंतरच्या काळात पुणे आणि मुंबई परिसरात लोकप्रिय झाला. यंदाच्या गुढीपाडवा शोभायात्रेच्या निमित्ताने करवीर गर्जना पथकाने पहिल्यांदाच हा नृत्य प्रकार कोल्हापुरात सादर केला. या नृत्याचा वेगळा बाज गणेशोत्सवातही अनुभवायला मिळणार आहे. 

मुंबईतील बेंजो 
"टाईमपास' चित्रपटातील "ही पोली साजूक तुपातली...' या गाण्यानं अनेकांचं काळीज बाद केलं. अर्थात साऱ्या महाराष्ट्राला या गाण्यानं चांगलंच डोलवलं. त्यानंतर आलेला रितेश देशमुखच्या "बेंजो' या चित्रपटामुळं तर या पथकांविषयी साऱ्यांनाच अधिक माहिती झाली. त्यामुळे मुंबईतील अशा बेंजो पथकांची भुरळही आता संपूर्ण महाराष्ट्राला पडते आहे. एका विशिष्ट लय आणि तालातील अशा बेंजो पथकांना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने निमंत्रित केले जाऊ लागले आहे. ग्रामीण भागातील मिरवणुका गौरी-गणपती विसर्जनादिवशी असल्याने या पथकांना निमंत्रित केले जाते. चिंतामणी बीटस्‌, जोगेश्‍वरी बीटस्‌, गोरेगाव बीटस्‌ अशा विविध नावांनीही ही पथके आहेत. 

अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा 
अंध मुलांना शिक्षण घेत त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने ऑकेस्ट्राची निर्मिती केली आहे. शहरातील विविध अंध कलाकारांची मोट बांधून आयडियल स्टार्स ऑर्केस्ट्रा गौतम कांबळे आणि दीपक कारंजकर यांनी तयार केला आहे. आजवर या ऑर्केस्ट्राचे चाळीसहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांचा त्यात समावेश आहे. संजय ढेंगे आणि बशीर शेख यांनी अंध युवक मंचच्या माध्यमातून अंध मुलांचा आर्यन्स बेंजो पार्टी आणि ऑकेस्ट्राची निर्मिती केली आहे. या ऑर्केस्ट्रा आणि बेंजो पथकांनाही गणेशोत्सवात मोठी मागणी असेल. 

ऑनलाईन मार्केटिंग 
स्थानिक ढोल-ताशा पथकांनी फेसबुक पेजेस तयार केली असून त्यावर विविध मिरवणुकांची छायाचित्रे अपलोड केली जातात. त्याशिवाय विविध नृत्य प्रकारांचे व्हिडिओजही अपलोड केले आहेत. साहजिकच त्याचा फायदा ढोल-ताशा पथकांच्या मार्केटिंगसाठी होतो. त्यातूनच आता देशभरातून या पथकांना मागणी वाढली आहे. 

कोल्हापुरात ढोल-ताशा पथकांची संख्या वाढू लागली आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य ढोल-ताशा पथक महासंघाच्या माध्यमातून कोल्हापुरात नुकताच रक्तदान महायज्ञ उपक्रम घेतला. यानिमित्ताने सर्व पथके एकवटली होती. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
- अद्वैत अडके, प्रतिनिधी, महासंघ 

यंदा सर्वच ढोल-ताशा पथकांना मोठी मागणी आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेली मागणी आम्हाला नाकारावी लागते आहे. डॉल्बीला लाखो रुपयांचा चुराडा होतो. मात्र ढोल-ताशा पथकांमुळे आता मंडळेही ढोल-ताशांकडे आकर्षित होत आहेत. 
- उदय पोतदार, शिवगर्जना पथक 

मुंबईत तर आमचे सतत विविध कार्यक्रम सुरू असतात; मात्र गेल्या वर्षीपासून कोल्हापुरातील मिरवणुकीचीही निमंत्रणे येत आहेत आणि आम्ही आनंदाने ती स्वीकारत आहोत. यंदाही आम्ही येणार असून मुंबई मेलडी बीटस्‌वर तरुणाईला नक्कीच डोलवू. 
- संदीप जाधव, एसपीजे मेलडी बीटस्‌, मुंबई 

अंध मुलांच्या पुनर्वसनासाठी आम्ही ऑकेस्ट्राची निर्मिती केली आहे. त्यातून त्यांना आर्थिक आधार मिळतो. मंगळवार पेठेतील बजापराव माने तालमीजवळील नाळे टॉवर्स येथे आमचे कार्यालय आहे. गणेशोत्सवासाठी आता आम्हीही सज्ज झालो आहे. 
- दीपक कारंजकर, आयडियल स्टार्स ऑकेस्ट्रा 

अंध विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे आम्ही निवासी वसतिगृह चालवत आहोत. सध्या येथे पंचवीस विद्यार्थी आहेत. गणेशोत्सवातील कार्यक्रमामुळे आमच्या या कामाला प्रोत्साहन मिळते. निमंत्रण स्वीकारण्यास आम्ही सज्ज आहोत. 
- संजय ढेंगे, अध्यक्ष, अंध युवक मंच