फेट्यांपासून पिशव्यांची निर्मिती

फेट्यांपासून पिशव्यांची निर्मिती

पोहाळे तर्फ आळते - येथील दोन तरुणांनी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध समारंभांत मिळालेले रंगीत फेटे जमा करून त्यापासून कापडी पिशव्या तयार करून संपूर्ण गावात घरोघरी मोफत वाटल्या. या उपक्रमाने ग्रामस्थांसमोर पर्यावरणरक्षणाचा नवा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. सुभाष रंगराव पाटील व अमोल भिवाजी काटकर अशी तरुणांची नावे आहेत.

राजकीय नेते, कार्यकर्त्यांना समारंभात मिळालेले फेटे घरी पडूनच असतात. या फेट्यांचा कोठेही वापर होत नाही. अडगळीत पडलेल्या फेट्यांपासून कापडी पिशव्या तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली. त्यांनी कल्पनेला मूर्त स्वरूप देताना फेटे जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. त्यांनी याबाबत नेते, कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर त्यांना विनामूल्य फेटे मिळत गेले. पहिल्या टप्प्यात ३०० फेटे जमा करून त्याच्या १ बाय २ च्या एक हजार पिशव्या तयार केल्या व गावात घरोघरी त्या कशा पोचतील याचे नियोजन केले.

प्राथमिक शाळा, हायस्कूल, अंगणवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने घरोघरी वाटल्या. दुसऱ्या टप्प्यात अशा पिशव्या जोतिबा डोंगर, कुशिरे परिसरात मोफत देणार असल्याचे दोघांनी सांगितले. त्यांना भाजपचे अजय चौगुले, अजितसिंह काटकर, सुरेश बेनाडे, मोहन डबाणे, पंडित पोवार, कृष्णात बोरचाटे, बळीराम मिसाळ, नामदेव शिंदे, सीताराम चौगले यांचे सहकार्य लाभले.

फेट्यापासून कापडी पिशव्या तयार करून मोफत वाटण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे या भागातील पर्यावरण चळवळीला मोठा हातभार लागणार आहे.
- के. बी. पाटील, 

माजी सरपंच पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा 

पोहाळे परिसरात प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मी व मित्र अमोलने प्लास्टिकबंदीचा जागर सुरू केला आहे. फेट्यापासून पिशव्या वाटल्यामुळे मोठे समाधान वाटत आहे. 
- सुभाष पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com