दुष्काळाने आटलेली माणगंगा प्रवाहित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

दिघंची - लोकसहभागातून माणगंगा नदी व ओढा पात्राच्या खोलीकरण, रुंदीकरण, चिलार झुडपांच्या स्वच्छतेचे काम झाले. परतीच्या पावसाने नदीवरील यादव वस्ती बंधारा तुडुंब भरला आहे. गाव पाणीदार बनले आहे. शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येणार आहे. पिण्यासह शेतीसाठी मदत होणार आहे. पत्रकारांनीच या कामासाठी पुढाकार घेतला होता.  

गावाला एक नदी व दोन ओढे लाभलेत. दुष्काळाच्या चक्रात अडकल्याने नदी कोरडीच होती. प्रवाहात दोन्ही बाजूने चिलार झुडपे वाढली होती. नदी, ओढा पात्र आक्रसले होते. पत्रकार संघाने पुढाकार घेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणले. नदी व ओढा पात्र स्वच्छ करण्याचे ठरले. लोकवर्गणी व प्रशासनाच्या मदतीने नऊ किलोमीटर नदी, ओढा पात्राचे खोलीकरण, सरळीकरण, चिलारमुक्त करण्यात आले. नदीने मोकळा श्वास घेतला.

परिसरात परतीचा पाऊस चांगला झाला. नदी व ओढा पात्र स्वच्छ केल्याने पाणी मुरण्यास, साठण्यास मदत झाली. दहा वर्षांनंतर माणगंगा पुन्हा प्रवाहित झाली. मोठ्या प्रमाणात प्रथमच पाणीसाठा झाला. नदी, ओढ्याच्या काठावरील विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. बंधाऱ्यातील पाणी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च अखेर राहील. दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी होत असे. यंदा गाव, वाडीवस्ती टॅंकर मुक्त राहील. शासनाचा टॅंकरवर होणारा लाखोंचा खर्च वाचेल.

उमरमोडीचे पाणी सोडा
वर्षानुवर्ष कोरड्या माणगंगा नदीला बारमाही करण्यासाठी हक्काच्या पाण्याची गरज आहे. नदीत उरमोडीचे पाणी सोडण्यासाठी आजपर्यंत घोषणाच झाल्या. सध्या राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी सोडल्यास सोलापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. सर्पक्षीय नेत्यांचे प्रयत्न गरजेचे आहे.

या पूर्वी माणगंगा नदीला पाणी आले. वाहून गेले. माझी नदीकाठाला शेती आहे. ऐंशी वर्षात प्रथमच मोठा पाणी साठ झाला आहे. आज पाणी पाहून समाधान वाटतंय.
-गोविंद भाऊ यादव (शेतकरी)