चिमुकल्यांनी समजून घेतली आंबा रोप निर्मितीची प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

इस्लामपूर - आंबा खाऊन फेकून दिलेल्या कोयीतून पुन्हा रोपाची निर्मिती कशी होते, याचा अनुभव मुक्तांगण शाळेत देण्यात आला. शिक्षकांच्या मदतीने हापूस आंब्याची पाचशे रोपे तयार करून ती वितरित केली.

इस्लामपूर - आंबा खाऊन फेकून दिलेल्या कोयीतून पुन्हा रोपाची निर्मिती कशी होते, याचा अनुभव मुक्तांगण शाळेत देण्यात आला. शिक्षकांच्या मदतीने हापूस आंब्याची पाचशे रोपे तयार करून ती वितरित केली.

आजी-माजी विद्यार्थ्यांच्या पालकांना, विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, वाळवा तालुक्‍यातील १९ केंद्रांतील ३८ जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना, पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखा, प्रांताधिकारी निवासस्थान आदी ठिकाणी लागवडीसाठी झाडे देण्यात आली. सचिव विनोद मोहिते यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. मोठ्या प्रमाणात ‘कोय’ उपलब्ध होण्यासाठी अद्वैता व शौर्या पाटील यांची मदत झाली. आदिती फुडसमधून चांगल्या प्रतीच्या हापूस आंब्याच्या कोया उपलब्ध केल्या. बीजारोपण करून देताना रोहित व श्रीनिकेत मोहिते यांची मदत झाली. अंकुर फुललेल्या ‘कोया’ रोपे तयार करण्यासाठी दिल्या. प्लास्टिक पिशवीत रोप ठेवून माती भरण्यास मुलांना मदत करण्यात आली. झाड कसे बनते या प्रक्रियेचा अनुभव मुलांनी घेतला. कलमी नसले तरीही लवकर फळे लागवीत म्हणून काय करावे यासाठी प्रबोधन केले गेले. 

जिल्हा परिषदेच्या ५० उपक्रमशील शिक्षक, केंद्रप्रमुखांना गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या हस्ते झाडे भेट देऊन माहिती दिली गेली. श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘असा उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडून करून घेता येईल. वृक्षलागवड चळवळ गतिमान करता येईल.’’ वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे म्हणाले, ‘‘माझ्या मुलाने छोट्या मित्रांसोबत सहजपणे बनवलेली रोपे कार्यलय आवारात लावलीत. ती वाढवण्याची दक्षता घेऊ.’’ 

उपक्रमामुळे मुलांना झाडं कशी बनतात हे समजले. स्वतः बनवलेली झाडे मुले निश्‍चितपणे जगवतील. काही वर्षांत आंब्याच्या चवीचा अनुभव घेतील.
- सरोजिनी मोहिते, अध्यक्षा