दोनशे महिला बनवतात दररोज तीन लाख पापड

नेहा गायकवाड
सोमवार, 3 एप्रिल 2017

पनवेल - छोटा खांदा हे नावाप्रमाणेच पनवेलजवळील एक छोटंसं गाव. एरव्ही या गावाचे काही वैशिष्ट्य असेल, असे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेललाही माहीत नाही. परंतु याच गावातून शेकडो महिला आपल्या रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारे सुमारे तीन लाख पापड दररोज तयार करतात. ऊन असो वा पाऊस; वर्षाचे बाराही महिने येथे पापड बनवण्याचे काम जोमाने सुरू असते. या व्यवसायामुळे गावातील दोनशे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.

छोटा खांदा येथील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पापड व्यवसाय निवडला आहे. या गावात कधीही फेरफटका मारला असता पापड लाटणाऱ्या महिला नजरेस पडतात. अनेकींच्या घरासमोर टोपल्यांवर ते पापड सुकवले जात असल्याचे चित्र दिसते. 

या गावातील प्रत्येक घरात हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. एका पापड कंपनीकडून या महिलांना दररोज प्रत्येकी सात किलो पापडाचे पीठ व ते लाटण्यासाठी साहित्य दिले जाते. किलोमागे या महिला दोनशे पंधरा पापड बनवतात. एका किलोला महिलांना ४१ रुपये मिळतात. यातून महिलांची दररोज किमान ३०० रुपयांची कमाई होते. 

पावसाळ्यातल्या चार महिन्यांतही येथील व्यवसाय सुरळीत सुरू असतो. या दिवसांत टोपल्यांवर पापड ठेवून स्टोव्हचा वापर करून ते सुकवले जातात. 

बावीस वर्षांपासून या उद्योगात काम करत आहे. घरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसे घर खर्च चालवणे कठीण होत होते. त्यामुळे स्वतः काहीतरी उद्योग करून घराला हातभार लावला आहे. शिवाय या व्यवसायातून आत्मविश्वासही वाढला आहे.
- लक्ष्मी सकपाळ, गृहिणी.

Web Title: 200 Women make daily three million cracker