गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मातीचा वापर न करता

मातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.

पुणे - शेती म्हटलं की शहर कधीच डोळ्यांसमोर येत नाही...डोळ्यांसमोर उभं राहत ते टुमदार गाव आणि त्यात पपई, केळी, चिकूच्या बागा, शेतात उभं राहिलेलं एखादं पीक हो ना! पण शहराच्या मध्यवर्ती भागातच शेत पाहायला मिळालं तर!! आश्‍चर्य वाटतंय ना!!!

डेक्कन परिसरात राहणाऱ्या सुनील आणि प्रिया भिडे यांनी सहाव्या मजल्यावरील आपल्या सदनिकेच्या गच्चीत घर आणि सोसायटीमधील शेकडो किलो ओला आणि सुका कचरा जिरवून टेरेस गार्डन नव्हे; तर चक्क ‘शहरी शेती’ विकसित केलीय. त्यांच्या या शेतात आठ-दहा पपईची झाडं, केळी, चिक्‍कू, आवळा, याबरोबरच शेवगा, दुधी भोपळा, लाल भोपळा, वांगी, टोमॅटो अशा भाज्या पिकविल्या जातात.

द एनर्जी अँड रिसोर्सेस्‌ इन्स्टिट्यूट (TERI) या संस्थेच्या वतीने नुकतीच ‘ग्रीन हिरोज्‌’ पुरस्कारांची घोषणा झाली असून, भिडे दाम्पत्याला हा पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने भिडे परिवाराशी संवाद साधण्याचा योग आला. घरातील ओला कचरा आणि सोसायटीच्या आजूबाजूला पडणारा पालापाचोळा यातून ते गच्चीवर शेती करत आहेत. मातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.

भिडे यांच्या गच्चीवरील या शेतात शेवग्याच्या एका झाडाला एका वेळी २०० शेंगा येतात, तर एका पपईच्या झाडाला २० ते ३० पपई, एका वेलीवर २०-३० दुधी भोपळे येतात. ‘‘शहरात गेल्या सहा-सात वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत असून, सध्या हा प्रश्‍न भीषण झाला आहे. त्यामुळे आपला कचरा आपल्याच घरी जिरवून शेती किंवा बाग साकारणे, हा उत्तम पर्याय वाटतो,’’ असे प्रिया सांगतात. त्यांनी छोट्या सदनिकेपासून मोठ्या सोसायट्यांपर्यंत अशी विविध मॉडेल्स विकसित केली आहेत. आजूबाजूच्या सोसायट्यांमधील दररोज तब्बल चार-पाचशे किलो कचरा ते आपल्या गच्चीतील शेतीच्या माध्यमातून जिरवतात. त्याशिवाय सोसायटीतील सांडपाण्याचा वापरही ते या शेतीसाठी करत आहेत. भिडे यांच्याकडे दररोज दीडशे किलो पालापाचोळा आणि दीडशे ते दोनशे किलो ओला कचरा जमा होतो आणि तो जिरवला जातो.