‘डिझायनर कपड्यां’चा  ऑफलाइन फंडा!

‘डिझायनर कपड्यां’चा  ऑफलाइन फंडा!

ऑनलाइनच्या जमान्यात कोणी ‘ऑफलाइन’ व्यवसाय सुरू करण्याचे ठरविल्यास स्वाभाविकच तुमच्या मनात काही प्रश्‍न निर्माण होतील. मात्र, ‘प्रवाहाविरुद्ध’ जाण्याचे धाडस दीप्ती आचार्य या तरुणीने दाखविले आहे. लहान मुलींसाठी ‘डिझायनर कपडे’ तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला असून, स्वतःचा वेगळा ब्रॅंड निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. पुण्या-मुंबईसह बंगळूर, हैदराबाद येथील नामांकित कपड्यांची दुकाने व मॉलमध्ये आता त्यांच्या ‘रोझ कट्यूर’ या ‘किड्‌स वेअर’ची चर्चा आहे.

‘प्रत्येक मूल सुंदर असते आणि आम्ही त्याच्या सौंदर्यात भर घालतो’ या ब्रीदवाक्‍यासह दीप्ती यांनी ऑक्‍टोबर २०१६मध्ये ‘रोझ कट्यूर’ ब्रॅंडला बाजारात आणले. पुण्यातील बावधन परिसरात उत्पादन सुरू करून त्यांनी ‘फॅशन डिझायनिंग’ शिकलेल्या तरुणींना तेथे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दीप्ती स्वतः नवीन डिझाईन्स बनवतात आणि त्याचे उत्पादन या युनिटमधील मुली करतात. दर महिन्याला काही नवीन डिझाईन्स लाँच केली जातात, तर त्यापूर्वीच्या डिझाईन्सचे ‘मास प्रॉडक्‍शन’ केले जाते व ते विविध शहरांतील दुकानांमध्ये पाठविले जाते. स्पेक्‍ट्रम क्‍लोदिंग’ नावाची कंपनी दीप्ती यांनी नोंदणीकृत केली असून, त्या अंतर्गत ‘रोझ कट्यूर’ हा ब्रॅंड सादर केला आहे. विशिष्ट वयोगटातील मुला-मुलींसाठी आणखी काही ब्रॅंड्‌स येत्या काळात त्या बाजारात आणणार आहेत.

दीप्ती म्हणाल्या, ‘‘सुरवातीच्या काळात आम्ही ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली. ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या माध्यमातून हा व्यवसाय करताना काही अडचणी जाणवल्या. ‘डिझाईन्स जास्त आणि उत्पादन कमी,’ अशा स्वरूपाचा हा व्यवसाय झाला होता. त्यामुळे आम्ही ऑफलाइन जाण्याचा निर्णय घेतला. मॉल, दुकाने आणि ‘फर्स्ट क्राय’ यांसारख्या खास लहान मुला-मुलींसाठी बनविलेल्या संकेतस्थळांवर आमच्या उत्पादनांचे सादरीकरण करण्यास सुरवात केली. त्यामुळे मर्यादित डिझाईन्स व त्याचे व्यापक प्रमाणातील उत्पादन शक्‍य झाले.’’

‘‘या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे सुरवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ‘तुम्ही डिझायनर आहात, मालक कोण आहे,’ असा प्रश्‍न विचारला जात असे. त्यामुळे अशा क्षेत्रात महिला म्हणून स्वतःचा ठसा उमटविण्याचा निश्‍चय केला आहे. माझे आई-वडील, भाऊ व बहीण यांच्या पाठिंब्यामुळे तो पूर्ण करता येईल असा विश्‍वास आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com