साताऱ्याच्या पुस्तकांनी गडचिरोलीतील ग्रंथालये केली समृद्ध!

Sandeep Patil IPS
Sandeep Patil IPS

आयपीएस अधिकारी म्हटले, की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो, तो त्याचा करारी बाणा आणि अधिकाराचे वलय. कदाचित काही वेळा अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाईट अनुभवपण अनुभवायला मिळतात. मात्र काही सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन समाजोपयोगी कामे करीत असतात; पण स्वतःहून ही कामे ते कधी सांगायला जात नाहीत. असाच एक अधिकारी साताऱ्याचा पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहतोय. संदीप पाटील हे या अधिकाऱ्याचे नाव. 

एक वेगळेच काम त्यांनी हाती घेतले आहे. आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या ध्येयाने संदीप पाटील यांना झपाटले आहेत. यापूर्वी संदीप पाटील नक्षलग्रस्त आदिवासी भागात नेमणुकीला होते. नक्षलवाद्यांनी वेढलेल्या भागातल्या लोकांना मूळ प्रवाहाशी जोडून घ्यायचे, तर त्यांची शैक्षणिक प्रगती व्हायला हवी हे त्यांना जाणवले. याची सुरवात शालेय विद्यार्थ्यांपासून करायला हवी, याचीही जाणीव त्यांना झाली. पाटील हे गडचिरोलीत जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करत होते. हा जिल्हा पूर्ण मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. येथील युवकांवर योग्य संस्कार व्हावेत, त्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी आपले मूळचे पोलिसी काम करत असतानाच या भागात ग्रंथालये सुरू केली. इथल्या भागातल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागावी, जगात इतरत्र काय सुरू आहे, याची माहिती त्यांना व्हावी आणि परिणामी हे युवक नक्षलवादापासून दूर राहावेत हा त्यामागचा उद्देश होता. 

नंतर पाटील यांची बदली साताऱ्याला झाली. मात्र, इथे काम करतानाही ते आपले उद्दिष्ट विसरले नाहीत. आपली ग्रंथालय चळवळ सुरू राहावी, यासाठी इथेही ते प्रयत्न करताना दिसतात. एरवी हळव्या मनाचा वाटणारा हा "आयपीएस' अधिकारी तेवढाच कणखर आहे. सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असताना त्यांनी हा कणखरपणा दाखवून दिला आहे. दुसरीकडे त्यांनी पुस्तके गोळा करण्याचे कामही सुरू ठेवले आहे. नक्षलग्रस्त भागातील ग्रंथालये विविध प्रकारच्या पुस्तकांनी समृद्ध व्हावीत, यासाठी त्यांनी साताऱ्याच्या नागरिकांना आवाहन केले आणि त्यांना भरघोस प्रतिसादही मिळाला. आपला सत्कार करताना किंवा कुठल्या कार्यक्रमात स्वागत करताना नागरिकांनी- संयोजकांनी आपणाला पुष्पगुच्छ देऊ नये, तर त्याऐवजी एखादे पुस्तक द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आणि सातारकरांनी ती उचलूनही धरली. 

त्यांची ही कल्पना लोकांना एवढी आवडली, की बघता बघता साताऱ्याच्या जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या चिरेबंदी इमारतीत पुस्तकांचा अक्षरशः ढीग जमा झाला. ही सर्व पुस्तके पाटील यांनी तातडीने गडचिरोलीला पाठवून दिली. आज तिथली ग्रंथालये सातारकरांनी प्रेमाने दिलेल्या पुस्तकांनी सजली आहेत. तिथल्या युवकांना समृद्ध करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com