भुकेल्याला घास देणारे कोल्हापूरचे रॉबिनहूड

सुधाकर काशीद
रविवार, 16 जुलै 2017

उच्चशिक्षित तरुणांचा सोशल मार्ग - वाया जाणाऱ्या अन्नाच्या वाटपाची सेवा

उच्चशिक्षित तरुणांचा सोशल मार्ग - वाया जाणाऱ्या अन्नाच्या वाटपाची सेवा

कोल्हापूर - हे सगळे अगदी चांगल्या घरातले आहेत. रेल्वे, बी.एस.एन.एल, इंजिनिअरिंग कॉलेज, व्यापार, उद्योग, खासगी व्यवसाय, शिक्षण क्षेत्रांतील आहेत. दिवसभर आपापल्या कामात असतात. रात्री साडेआठ, नऊनंतर यांची फोनाफोनी सुरू होते. मग एका ठिकाणी हे एकत्र येतात. काहीजण जेथे जेवणावळी आहेत अशा मंगल कार्यालयात, काहीजण ठराविक हॉटेलमध्ये जातात. तेथे शिल्लक राहिलेले चांगले अन्न आपल्याजवळच्या भांड्यात घेतात आणि तडक एस. टी. स्टॅंड, रेल्वे स्टेशनवरील फिरस्ते किंवा काही मजुरांच्या वस्तीत जातात. तेथील गरजूंना ते जेवण वाटतात.

तेथे उपकाराची भाषा अजिबात नाही. आपण कोण आहोत, हेही ते सांगत नाहीत. जेवण वाटतात आणि आपापल्या घरी निघून जातात. हॉटेल, मंगल कार्यालये किंवा खासगी समारंभांतील शिल्लक जेवण वाया जाऊ नये, ते कचऱ्यात फेकले जाऊ नये, त्यापेक्षा ते गरजूंच्या पोटात जावे, केवळ याच हेतूने हे सर्वजण धडपडतात. रोज नाही; पण आठवड्यातून दोन-तीन दिवस नक्की हे काम करतात.

हे सगळे कोल्हापुरातले रॉबिनहूड आहेत. रॉबिनहूड हेच त्यांच्या संघटनेचे नाव आहे. रॉबिनहूड हे इंग्रजी चित्रपटातले एक कल्पक; पण प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. हा रॉबिनहूड म्हणजे तो जे मिळवायचा, ते गरिबांसाठी वाटून टाकायचा. अर्थात तो सर्वांच्या गळ्यातला ताईत ठरायचा. या रॉबिनहूडची प्रेरणा घेऊन हे सर्वजण एकत्र आले आहेत. गरिबांसाठी करायचं म्हटलं तर खूप काही आहे; पण यांनी वाया जाणारे जेवण गरिबांपर्यंत पोचवायचं एवढ्या एकाच कामावर लक्ष केंद्रित केले.

यांनी दोन महिन्यांपूर्वी काही हॉटेल चालक, कॅटरर्स, मंगल कार्यालय चालकांशी संपर्क साधला. सोशल मीडियावरही आपला हेतू सांगितला. त्यामुळे हळूहळू लोक त्यांच्याशी संपर्क करू लागले. काही हॉटेलवाले बोलावून शिल्लक पदार्थ देऊ लागले. मंगल कार्यालयवालेही अधूनमधून फोन करू लागले. फोन आला, की पंधरा-वीसजण पटापट एकत्र येतात. कोणाची दुचाकी, कोणाची चारचाकी घेऊन ते तेथे जातात. त्यांच्याकडील भांड्यात अन्न घेतात. तत्पूर्वी अन्न चांगलेच आहे, ते आंबलेले नाही याची खात्री करून घेतात. हे अन्न घेऊन ते स्टॅंड, रेल्वे स्टेशनवर येतात. तेथे अनेक गरजू असतात; पण भिडेमुळे ते पुढे येत नाहीत. मग हे भीक नाही असे समजावून सांगतात. अन्न वाया जाऊ नये म्हणून आमची ही छोटीशी धडपड आहे, असे विनम्रपणे सांगून हात जोडतात.

रोज नाही; पण आठवड्यातून तीन-चार दिवस तरी हे काम करतात. एस.टी. स्टॅंड, रेल्वे स्टेशन यांबरोबरच काहीजण झोपडपट्टीत, मजुरांच्या वस्तीत जातात. तेथले लोक जेवलेले असतात; पण दुसऱ्या दिवसासाठी ते जेवण जरूर घेतात. पटणार नाही; पण हे काम करणाऱ्या रॉबिनहूडमध्ये काही अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, संगणक व्यावसायिक आहेत. त्यांत महिला व मुलीही आहेत. त्यांचे काम पाहून काहीजण हसतात. नेहमीप्रमाणे प्रसिद्धीसाठी नाटक असेल असे समजून काहीजण टोचून बोलतात; पण हे रॉबिनहूड कोणाला प्रत्युत्तर देत नाहीत. जगातल्या सगळ्या अर्धपोटी लोकांची नव्हे, तर किमान ५० जणांची भूक भागवतात. त्याहीपेक्षा वाया जाणारे अन्न ते वाचवून गरजूंच्या मुखात घालतात.