'ड्रायव्हिंग'सह सर्व कामे पायाने करणारा योगेश

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 17 जानेवारी 2017

अपंग असल्यामुळे ड्राइव्हिंग लायन्स मिळू शकत नाही. दारू पिऊन अपघात करणाऱ्यांना येथे लायसन्स दिले जाते; पण अपंगाच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच येत असल्याची खंत योगेशने व्यक्त केली.

परभणीतील युवकाचा जीवनप्रवास 

सावर्डे : दोन्ही हात नसताना सामान्य माणसांच्या तुलनेतही असामान्य कर्तृत्वाची झलक दाखवणाऱ्या परभणीच्या योगेश खंदारेची यशोगाथा सर्वांनाच अचंबित करणारी आहे. पाय, डोळे, कान असूनही धडधाकट माणसाला यश मिळत नाही; पण दोन्ही हात नसणाऱ्या योगेशने जिद्द, आत्मविश्‍वास आणि चिकाटीच्या जोरावर सर्व गोष्टींवर मात केली आहे. 

गोविंदराव निकम यांच्या जयंतीमहोत्सवात त्याने आपला जीवन प्रवास उलगडला. 
सावर्डे येथे आयोजित गोविंदराव निकम जयंती महोत्सवात प्रेरणादायी कार्यक्रमाअंतर्गत योगेश खंदारेला बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली... वयाच्या सहाव्या वर्षी विजेच्या धक्‍क्‍याने दोन्ही हात निकामी झाल्याने अपंगत्व आले. मनाने न खचता, केवळ तीव्र महत्त्वाकांक्षा आणि अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर पदवी शिक्षण घेत असलेल्या योगेशला आई-वडिलांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्णत्वास न्यायचे आहे. दोन्ही हात नसतानाही पायाने लिहिणे, चित्र काढणे, कॅरम खेळणे, स्वत:ची तयारी करणे, इस्त्री, जेवण, स्वयंपाक करणाऱ्या योगेशने जीवनाचा प्रवास उलगडला, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. 

मोटारीचा दरवाजा उघडण्यापासून तो कोणतीही गाडी सहज चालवतो. त्याचे प्रात्यक्षिके त्याने दाखवले. एका तासात तो पन्नास किमी प्रवास करतो. एटीएम असो किंवा बॅंकेचे व्यवहार असो, तो सर्व कामे स्वत:च करतो. दुचाकी, मोटार, मोबाइलवर चॅटिंग, कॉलिंग असो की कोणतीही गोष्ट सहज साध्य करणाऱ्या योगेशचा प्रवास अपंगत्वाची सहानुभूती मिळविणाऱ्या अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 
अपंग असल्यामुळे ड्राइव्हिंग लायन्स मिळू शकत नाही. दारू पिऊन अपघात करणाऱ्यांना येथे लायसन्स दिले जाते; पण अपंगाच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच येत असल्याची खंत योगेशने व्यक्त केली. योगेशने मोबाईलवर कॉलिंग, अनेकांशी चॅटिंग, केस विंचरणे, चष्मा घालणे, जेवण करणे, लेखन करणे अशा कित्येक गोष्टी सहज करून दाखवताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. 

अपंगांसाठी काम करण्याची महत्त्वाकांक्षा 
दोन्ही हात गेल्यानंतर आत्महत्या करण्याचा मनात विचार आला होता; पण केवळ आई-वडिलासाठी जगून अपंगांसाठी मोठे काम करायची महत्त्वाकांक्षा त्याने बाळगली आहे. एका महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचे त्याचे स्वप्न आहे. 

काही सुखद

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

मिरज - भक्त गणेशाला अनेक रूपांत पाहतात. कल्पनेनुसार बप्पा साकारतात. उत्सवात सजवून-धजवून 11 दिवस आराधना करतात. परंतु जन्मापासून...

12.09 PM

उपराजधानीत १७ जणांच्या दानातून २६ जणांचे वाचले प्राण नागपूर - दोन वर्षांपूर्वीची घटना. पाण्याचा बंब पेटविताना चेहरा आणि हात...

रविवार, 13 ऑगस्ट 2017