४४ सेकंदांत फोडल्या ७७० टाइल्स!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कार्तिकचा विक्रम - एशिया व इंडिया बुकमध्ये होणार नोंद
नागपूर - नागपूरच्या कार्तिक अनिल जयस्वाल या तरुणाने रविवारी(ता.१६) ४४ सेकंदांमध्ये ७७० टाइल्स फोडून नवा विक्रम रचला. कार्तिकने एकाचवेळी एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डससाठी प्रयत्न केला. एका मिनिटात जे लक्ष्य गाठायचे होते, ते अवघ्या ४४ सेकंदांमध्ये पूर्ण केल्यामुळे नवे आव्हान त्याने इतरांपुढे उभे केले आहे.

तेजस्विनी विद्या मंदिर येथून यंदाच दहावी उत्तीर्ण झालेला कार्तिक कराटेपटू आहे. त्याने मजहर खान यांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेतले आणि अतिशय कमी वेळात कौशल्य प्राप्त केले. याचाच फायदा त्याला आज विक्रम रचताना झाला. हनुमाननगर येथील संत रविदास सभागृहात राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे कलचुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात  आला होता. त्याचवेळी सर्वांच्या उपस्थितीत विक्रम रचून आणखी एका गौरवासाठी कार्तिक पात्र ठरला. डॉ. सुनीता धोटे यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌साठी तर डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌साठी परीक्षण केले. सातशे टाइल्स फोडण्याचे नियोजन असल्याने जेमतेम व्यवस्था करण्यात आली. मात्र, कार्तिकने हाताला दुखापत होईपर्यंत टाइल्स फोडण्याचा सपाटा सुरू ठेवला. ७७० टाइल्स फोडल्यानंतरही आणखी पुढे जाण्याची त्याची क्षमता होती. मात्र, टाइल्स कमी पडल्या. एशिया बुकसाठी ४०० तर इंडिया बुकसाठी ३०० टाइल्स फोडणे अनिवार्य होते. कार्तिकने त्याच्याही पलीकडे जाऊन विक्रम रचला. 

अशापद्धतीचा कुठलाही  विक्रम नसल्यामुळे कार्तिकने मैलाचा दगड गाठलेला आहे, असे परीक्षक डॉ. सुनीता धोटे आणि डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी सांगितले. या वेळी विश्‍वविक्रमी शेफ विष्णू मनोहर, तेजस्विनी विद्या मंदिरचे अध्यक्ष डॉ. वागेश कटारिया, महाराष्ट्र शिकई असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या हस्ते कार्तिकला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.