मूल्यवर्धनाने विद्यार्थ्यांत झाला बदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

काटोल - महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्या फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने राज्यात प्रतिजिल्हा एक शाळा याप्रमाणे मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या पुढाकाराने काटोल-नरखेड तालुक्‍यातील १०० टक्के शाळेत हा उपक्रम मागील वर्षीपासून राबविण्यात येत आहे.

पाच जुलै हा मूल्यवर्धन दिन म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दिग्रस येथे झाला. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राजू धवड, मूल्यदूत राजू तिजारे, मुख्याध्यापक योगेश पराते, राजेंद्र बोरकर, शैला वंजारी, मनीषा अडळे उपस्थित होते. दिग्रस बु. येथे २०१६-१७ पासून मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिली ते तिसरीसाठी घेण्यात येणारे उपक्रम हे विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी सुसंगत आहे. सहज आनंददायी पद्धतीने घेतले जाणारे उपक्रम छोट्या छोट्या उपक्रमांतून विविध अपेक्षित वर्तन बदल घडून येताना दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक, सामाजिक व मानसिक वर्तन बदल घडून येतात. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी, स्वजाणीव नीटनेटकेपणा हे गुण मुलांच्या अनुभवातून दिसून येत आहे. घटनेच्या न्याय, स्वतंत्र समता, बंधुता, या मूल्यांसोबत सुज्ञान, सुसंस्कारित जबाबदार नागरिक कसा तयार होईल, हे मूल्यवर्धन उपक्रमाची फलश्रुती आहे. अशी सुसंस्कारित पिढी तयार करण्यासाठी दिग्रस शाळेतील शिक्षक व पालक सतत प्रयत्नशील आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होत असून, भावी भारताचा सक्षम नागरिक तयार करण्यासाठी उपक्रम उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य राजू धवड यांनी व्यक्त केले आहे.