नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन शाळांतील  विद्यार्थी गिरविणार डिजिटल धडे

विजय पगारे 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

इगतपुरी - तालुक्‍यातील आदिवासी भागातील नांदूरवैद्य व अस्वली स्टेशन गावातील जिल्हा परिषद शाळा पाच दशकांपासून अविरतपणे ज्ञानदीप उजळण्याचे काम करीत असून, शिक्षणाचा मार्ग सहज सुकर होण्यासाठी येथील सरपंच दिलीप मुसळे यांच्या प्रयत्नातून मुलांना कॉम्प्युटरचे धडे गिरविण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे संगणक व एलसीडी संच देण्यात आले. प्रोजेक्‍टरच्या सहाय्याने शिकण्याची प्रक्रिया सहज सुलभ होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दैनंदिन अध्ययन आणि अध्यापन करणे शक्‍य झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात संगणकाचे ज्ञान अवगत होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिक्षणविस्ताराधिकारी एन. डी. मोरे यांनी केले. नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत सरपंच दिलीप मुसळे यांच्या प्रयत्नातून येथील शाळेतील मुलांना संगणक संच मिळाल्याने आता परिपाठ संगणकाद्वारे करतात. मुख्याध्यापक रंजना पैठणकर या मुलांना संगणकीय धडे देतात. यामुळे दुर्गम भागात मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. लर्निंग किट, प्रोजेक्‍टर, एलसीडी प्रोजेक्‍टर, स्क्रीन मिळाल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले. हे साहित्य मिळविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका रंजना पैठणकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी केंद्रप्रमुख दिलीप देवरे, सरपंच दिलीप मुसळे, उपसरपंच संतोष यंदे, सदस्य सुधाकर बोराडे, रोहिदास सायखेडे, प्रवीण आवारी, मनोहर काजळे, पंढरीनाथ मुसळे, मुख्याध्यापक बोराडे, ग्रामसेवक किरण अहिरे, बहिरू मुसळे, ज्ञानेश्‍वर मुसळे, दीपक जोशी, भास्कर मुसळे, राजू काजळे, सचिन गोडसे, सचिन कर्पे, समाधान मुसळे, दीपक मुसळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

खेड्यापाड्यातील शाळांमध्येदेखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्‍चित वाढण्यास मदत होईल. मुलांना कृतिशील बनविण्यासाठी उपयोग तर होईल शिवाय, दप्तराचे ओझेदेखील यामुळे कमी झाले आहे.
- दिलीप मुसळे, सरपंच, नांदूरवैद्य