युवा सरपंच योगिताची भरारी; नीती आयोगाचे निमंत्रण

sarpanch
sarpanch

रामटेक : समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेली शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतची युवा सरपंच योगिता गायकवाड हिला नीती आयोगातर्फे आयोजित पंचायतराज बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत 12 जानेवारीला ही बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातून केवळ तीनच सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे, हे विशेष.

पंचायतराज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या बैठकीत सरपंचांच्या सूचना मागविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, डॉ. बाबासाहेब घुले आणि योगिता हे तीन सरपंच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. बैठकीत ग्रामीण राष्ट्रीय स्वराज, यशवंत पंचायतराज आदींमध्ये आवश्‍यक सुधारणा आणि महत्त्वाच्या तरतुदींसंदर्भात या तिघांनाही विचार मांडायचे आहेत. अलीकडेच नागपुरात झालेल्या ऍग्रोवनच्या सरपंच महापरिषदेत योगिताच्या प्रभावी वक्‍तृत्वाने अनेकांचे लक्ष वेधले होते. पोपटराव पवार आणि "सकाळ-ऍग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी तिचे विशेषत्वाने अभिनंदन केले. रामटेक तालुक्‍यातील शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतची पहिली सरपंच होण्याचा मान योगिता गायकवाड या सर्वसाधारण कुटुंबातील तरुणीला मिळाला. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या योगिताने ग्रामपंचायत लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेत महिलांची उपस्थिती वाढवली आणि लोकसहभागाचे वावडे असलेल्या इतर ग्रामपंचायतींपुढे तिने आदर्श उभा केला. योगिताच्या कार्याची दखल केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने घेतली. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी योगिताला यासंदर्भात माहिती दिली. खासदार कृपाल तुमाने आणि माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

"तनिष्का'च्या शिरपेचात मानाचा तुरा
योगिता ही शीतलवाडीच्या तनिष्का गटाची समन्वयकदेखील आहे. तिने बंद असलेली नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी "तनिष्का'च्या माध्यमातून प्रयत्न केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना भेटून समस्या मांडली. पालकमंत्र्यांनी त्याची लगेच दखल घेऊन बैठक घेतली व योजना कायमस्वरूपी सुरू करण्याचे आदेश दिले. योजनेच्या दुरुस्तीसाठी 16 लाखांचा निधीही उपलब्ध झाला. तेव्हापासून ही योजनाही सुरळीत आहे. योगिताच्या या यशामुळे "तनिष्का'च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com