गुंडेवाडीकरांनी केली पाणीटंचाईवर मात

संजय जगताप
सोमवार, 17 एप्रिल 2017

शासकीय टॅंकरची वाट न पाहता सर्व गावकऱ्यांची एकीचे बळ दाखवत पाणीटंचाई दूर कऱण्यासाठी हातभार लावला.
- चंद्रकांत निकम, ग्रामस्थ, गुंडेवाडी

मायणी  - मायणी प्रादेशिक पाणी योजना थकीत वीजबिलापोटी बंद पडली. योजनेत समावेश असलेल्या गुंडेवाडी (ता. खटाव) ग्रामस्थांनी शासकीय उपाययोजनांची वाट न पाहता सर्वांनी एकत्र येऊन पदरमोड केली. नवीन कूपनलिका घेऊन पाणीटंचाईवर मात केली. त्या गावकऱ्यांचा त्यांच्या एकीचा आदर्श निश्‍चितच इतरांनी घेण्यासारखा आहे. 

गुंडेवाडी म्हणजेच अलीकडे मराठानगर असे नामकरण झालेले हजार- बाराशे लोकसंख्येचे गाव. गावाला मायणी प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, थकीत वीजबिलामुळे प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने चार मार्च २०१७ रोजी खंडित केला. परिणामी योजनेत समाविष्ट गुंडेवाडीसह सर्वच गावांचा पाणीपुरवठा बंद झाला. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने गुंडेवाडी ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल सुरू झाले. पाण्याचे स्त्रोत शोधून लोकांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी गुंडेवाडीकरांकडून पाऊले उचलली जाऊ लागली. मात्र, गावातील विहिरी, विंधन विहिरी, हातपंप कोरडे ठणठणीत पडल्याने पंचायतीचाही नाईलाज झाला होता. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली. लोकांना सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणणे भाग पडू लागले. तीव्र टंचाईने त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी गावातील प्रमुख एकत्र आले. 

तातडीच्या विविध उपाययोजनांवर चर्चा केली. शेवटी लोकवर्गणी काढून पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार दादासाहेब निकम, अनिल निकम, किसन निकम, परशराम निकम ( हवालदार), बाबूराव निकम, रामचंद्र थोरात, आनंदराव निकम आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी येरळा नदीकाठी स्मशानभूमीजवळ नव्याने कूपनलिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांनी पदरमोड केली. सुमारे पाचशे फूट खोल कूपनलिका घेतली. नव्या कूपनलिकेला पाणीही पुरेसे लागले आहे. 

जलवाहिनीद्वारे ते पाणी गावातील ज्योतिर्लिंग मंदिरनजीकच्या जुन्या पाण्याच्या टाकीत सोडले. पाणी साठवण टाकीखालील नळाद्वारे लोक पाणी घेऊन जात आहेत. पाणीटंचाईवर तातडीने मार्ग काढल्याने लोक समाधान व्यक्त करीत आहेत.