प्रक्रियेवर आधारित एकात्मिक शेती

vitthal shinde
vitthal shinde

स्वतःच्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवून वर्षभर पैसे हातात राहून घर चालवता येईल, असे नियोजन करून विठ्ठल शिंदे शेती करतात.

बोरी (ता. जुन्नर) येथील विठ्ठल शिंदे यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात प्रक्रियाधारित एकात्मिक शेतीचे वैशिष्ट्यपूर्ण आदर्श मॉडेल विकसित केले आहे. हंगामी पिके, त्याला व्यावसायिक आणि राज्यासाठी नव्या असलेल्या पिकांची जोड, विविध शेती पद्धतींचा संगम, उत्पादनांवर प्रक्रिया करून विक्री हे त्यांच्या शेतीचे मुख्य सूत्र आहे. त्यांना वारकरी कुटुंबाचा वारसा आहे. व्यापारीकेंद्रित बाजार व्यवस्थेला कंटाळून त्यांनी विकेल तेच पिकविण्याचा आणि स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार शेतीची रचना केली. गरजा आणि अनुभव लक्षात घेऊन वर्षभर उत्पन्न देऊ शकेल, अशी शेती पद्धती अंगीकारली आहे. शेतकऱ्याला वर्षभरात गरजेनुसार पैसे लागतात. दरमहा घरखर्च असतो. शेतीची कामे, वर्षाकाठी लग्न-समारंभ इत्यादी खर्च असतात. त्यानुसार, वडिलोपार्जित चार एकर शेतीचे २०-२०-६०-६० गुंठे असे भाग पाडून त्यात विविध पिके घेणे हा त्यांच्या एकात्मिक शेतीचा पाया आहे. 

दैनंदिन गरजांसाठी निश्‍चित क्षेत्र 
कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हे क्षेत्र कायमस्वरूपी ठेवले. यापैकी दहा गुंठ्यांत घर, गोठा, गोबरगॅस संयंत्र, परसबाग, प्रक्रिया केंद्र आणि पॅकिंग हाऊस आहे. काही क्षेत्रात रानभाज्या घेतल्या जातात. डोंगराळ भागातील भाज्यांचे संवर्धन परसबागेत होते. यापूर्वी ड्रॅगनफ्रूट या फळझाडाची नर्सरीही उभारली होती. आता मलबेरी फळ हे मुख्य नगदी पीक झाले आहे. फळांची २०० रुपये किलोने विक्री होते. व्यावसायिक पद्धतीने फळ उत्पादनाचा हा उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असावा. यापूर्वी पॉलिहाउसमध्ये जरबेरा फुलाचाही प्रयोग केला. 

हंगामी उत्पादनासाठी निश्‍चित क्षेत्र 
खरिपात बाजरी, रब्बीत गहू आणि एखादा भाजीपाला घेतला जातो. यातून हंगामी उत्पन्न मिळते. पूर्वी या क्षेत्रावर वार्षिक उत्पन्न देणारी केळी आणि उसासारखी पिके होती. वार्षिक खर्चासाठी एकरकमी मोठी रक्कम हाती यावी, हा त्यामागील उद्देश होता. आता हे क्षेत्र मलबेरी फळपिकाखाली आहे. बहुतांश क्षेत्र ठिबकखाली असून जैविक मल्चिंग केले जाते. शेतातील एक काडीही वाया जात नाही. 

प्रक्रियाधारित शेतीसाठी निश्‍चित क्षेत्र 
पूर्वी आवळ्याची १६० झाडे होती. आता ती पंचवीसच आहेत. याशिवाय २०० साग, बिनकाट्याचे बेल, सात अर्जुन, दहा चिंच, दोन पळस, चार हापूस आंबे, एक बेहडा, पांढरी गुंज, अश्‍वगंधा, काळी निरगुडी, माका आणि शतावरी अशी झाडे आहेत. सुमारे ४० प्रकारच्या वनौषधी आहेत. यातून वर्षभर उत्पादन सुरू असते. 

उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री 
स्वानंद हेल्थ फूड्‌स या ब्रॅंडने आवळा रस, कॅंडी, आवळा मावा, सुपारी, पावडर आणि आवळा लोणचे यांची विक्री होते. नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून या प्रक्रिया उद्योगाला अनुदान मिळाले होते. गरजेनुसार कच्चा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. द्राक्षे खरेदी करून मनुके बनवतात. मागणी असल्यास गव्हाचे तृणांकुर तयार करून पावडर आणि शतावरी कल्पही बनवतात. प्रक्रियेमुळे शेतीतील नफा काही टक्‍क्‍यांनी वाढतो, असा त्यांचा अनुभव आहे. मुंबई, शिर्डी, नारायणगाव इत्यादी विविध ठिकाणी उत्पादनांची विक्री केली जाते. कृषी विभागाच्या महोत्सवातूनही ग्राहक जोडले जातात. विठ्ठलरावांचा मोठा मुलगा सतीश प्रक्रिया उद्योगाची जबाबदारी सांभाळतो. सेंद्रिय शेतीवर भर असतो. 
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सहली, आयुर्वेदाचे अभ्यासक, वनौषधी प्रेमी यांनी विठ्ठलरावांच्या शेताला भेटी दिल्यात. विविध शासकीय, अशासकीय संस्था, बचत गट यांना प्रकियाविषयक प्रशिक्षणही त्यांनी दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com