असहाय मुलीला बालदिनी मिळाले ‘आप्तस्वकीय’

असहाय मुलीला बालदिनी मिळाले ‘आप्तस्वकीय’

पुणे - लहान वयातच तिच्यावर घराचा गाडा ओढण्याची वेळ आली, त्यात आई-वडील आजारी... त्यांचा सांभाळ करण्याचीही जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे तिच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. अभ्यासात हुशार असलेल्या तिने परिस्थितीपुढे हात न टेकविता धुण्या-भांड्याची कामे सुरूच ठेवली. प्रचंड हालअपेष्टा सुरू असताना तिच्या आयुष्यात एक चांगला दिवस आला. तिला आप्तेष्ट मिळाले, त्यांनी तिचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही कहाणी.

विश्रांतवाडीत राहणारी मनिंदर कौर अभ्यासात चांगलीच हुशार. त्यामुळे तिचे माता-पिता खूश होते. आई घरकाम करून, तर वडील सायकलच्या दुकानात राबून एकुलत्या एक मनिंदरच्या भावी आयुष्यासाठी झगडत असतानाच आई आजारी पडली. सहा-सात वर्षांपूर्वी तिने अंथरूण धरले. मेंदू नीटपणे काम करत नसल्याने त्यांना काम सोडावे लागले. त्या वेळी बाल मनिंदरवर आणखी एक आघात झाला. वडीलही आजारी पडले. त्यांना काम होईना, त्यामुळे त्यांनाही घरीच बसावे लागले. दोन्ही पालनकर्ते आजारी पडल्याने मनिंदरच्या शिक्षणावरही परिणाम होऊ लागला; मात्र तिने जिद्द सोडली नाही. अकरावी, बारावी पार करत असतानाच तिने धुणी-भांडी करण्याचे काम स्वीकारले. विश्रांतवाडीमध्येच ती चार-पाच घरी काम करू लागली आणि त्यावर मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर घर चालवू लागली. पालकांच्या उपचारावरील खर्च, तिच्या शिक्षणाचा खर्च भागवताना आणि आकस्मिक अडचणींचा सामना करत तिची कसरत सुरू होती. शिक्षणही सुरूच होते. यंदा ती बीकॉमच्या पहिल्या वर्षात गेली. समोर चांगले भविष्य खुणावत होते; मात्र त्याचवेळी पैशांची चणचण भासत होती. 

दुपारी बाराचे कॉलेज. तोपर्यंत सकाळच्या वेळेत धुणी-भांडी करण्याचे काम आणि नंतर कॉलेज गाठायचे. तेही बऱ्याच अंतरावर खडकी येथे. संध्याकाळी पाचला कॉलेज सुटायचे. पुन्हा घरी आई-वडिलांच्या सेवेत. ना कुणी नातेवाईक, ना कुणी मानसिक आधार देणारे. ती खूपच असहाय झाली. काही स्थानिक तिला मदत करायचे; पण त्याला मर्यादा आल्याच. अशातच तिच्या आयुष्यात एक दिवस चांगला उजाडला. 

जीवनमित्र एज्युकेशन सोसायटीचे तिला बोलावणे आले. तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका महिलेने या संस्थेचे संस्थापक विनायक देवकर यांना तिच्याबद्दल सांगितले होते. या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते. देवकर यांनी मनिंदरची सारी कहाणी ऐकून घेतली आणि तिला दरमहा तीन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. यासोबत शैक्षणिक साहित्य, बसचा पास, घरातील किराणा सामान, कपडेही दिले. तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळेपर्यंत तिला शिष्यवृत्ती देण्याचा देवकर यांचा निश्‍चय आहे. हा दिवस होता बालदिन. या दिवशी तिला जीवनमित्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आप्तस्वकीय मिळाले. त्यामुळे यंदाचा बालदिन तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. तिला खूप शिकायचे आहे, पुढे जायचे आहे. आई-वडिलांना आजारातून बरे करायचे आहे.

रंजल्या गांजल्यांची शाळा
विश्रांतवाडीत महात्मा गांधी स्कूल हे रंजल्या-गांजल्यांची शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे सध्या नर्सरी ते इयत्ता दुसरीपर्यंत वर्ग आहेत. शाळेत २०८ विद्यार्थी शिकतात. बहुतांश मुले विधवा, घटस्फोटितांची आणि परिस्थितीने अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबांतील आहेत. शंभरावर मुले मुस्लिम समुदायातील आहेत. ही शाळा म्हणजे या विद्यार्थ्यांचे कुटुंबच बनली आहे.

मध्यंतरी शिक्षण खात्याने या शाळेची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही सुरू केली होती. तसे सबळ कारण काहीही नव्हते. संस्थापक विनायक देवकर यांनी त्या वेळी पुण्यातील शिक्षण विभागापासून मुंबईत मंत्रालयापर्यंत धडक मारून सरकारशी संघर्ष केला आणि शाळा टिकवण्यात ते यशस्वी झाले. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला; पण अखेरीस त्यांची तळमळ आणि वंचितांच्या शिक्षणाप्रति असलेली कळकळ पाहून सरकारला इरादा बदलावा लागला अन्‌ महात्मा गांधी स्कूलमधील किलबिलाट कायम राहिला. विशेष म्हणजे ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. गरिबांच्या मुलांना शाळेत जायला मिळणेच कठीण, तेथे इंग्रजी शिक्षण कसे मिळणार. देवकरांनी दूरदृष्टीने आणि मोठ्या नेटाने शाळा काढली आहे. ही शाळा नसती तर गोर-गरिबांची ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच राहिली असती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com