जिद्दीच्या जोरावर जीवनाला ‘गती’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

अल्पशिक्षितपणावर मात; ‘टाटा मोटर्स’मध्ये रुजू

पुणे - स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाचा आधार बनायचे, असे ‘त्या’ दोघींनी ठरविले... पण, वाट मिळत नव्हती. अल्पशिक्षित असल्यामुळे कोणी नोकरीही देत नव्हते. त्यांच्यातील जिद्द आणि आत्मविश्‍वासानेच त्यांना काम करण्याचे बळ दिले अन्‌ वाटही... त्यांचा हाच विश्‍वास कामी आला आणि त्या ‘टाटा मोटर्स’मध्ये बसचालक म्हणून त्या रुजू झाल्या.

मोनाली साठे आणि राजश्री खरात अशी त्यांची नावे असून त्यांच्यासारख्या कित्येक महिलांना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे. बसचालक म्हणून फक्त पुरुष मंडळीच काम करू शकतात, हे चित्र पुसून टाकत त्या दोघींनीही ‘ड्रायव्हिंग’चा कोर्स केला आणि सन्मानाची नोकरीही मिळवली.

स्पीड फाउंडेशन आणि आगा इंडस्ट्रीजमार्फत त्या दोघींना तीन महिन्यांचे सॉफ्ट स्किल्स आणि वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनीही आपली क्षमता सिद्ध केली. ‘यार्दी सॉफ्टवेअर्स’ कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत त्यांना बसचालक होण्याची संधी मिळाली.

माझे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही. चालक म्हणून काम करता यावे, या उद्देशाने मी ड्रायव्हिंगचा कोर्स केला. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. आज महिलाही मागे नाहीत, हे आम्ही दाखवून दिले.
- मोनाली साठे, बसचालक तरुणी

शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यामुळे न खचता ड्रायव्हिंगचा कोर्स केला. त्यामुळे बसचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज मी आणि मोनाली निर्धास्तपणे बस चालवतो. लोक आमच्या कामाला दाद देतात. मी विवाहित असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करते.
- राजश्री खरात, बसचालक महिला