संकल्प... अवयवदान व देहदानाचा!

अमोल मोहिते
शनिवार, 22 एप्रिल 2017

रेठरे परिसरातील ४७ जणांचा समावेश; डॉ. मोहिते दांपत्याचा पुढाकार

रेठरे बुद्रुक - आपल्या पश्‍चात दुसऱ्याच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्याची किमया देहदानात आहे, ही बाब केवळ एकून न घेता परिसरातील तब्बल ४७ जणांनी देह व अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. याबाबत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सविता मोहिते यांनी प्रबोधन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याने ४७ पैकी ४४ जणांनी अवयव, तर तिघांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यात मोहिते दांपत्यांचाही समावेश आहे. 

देहदान व अवयवदानाची संकल्पना समाजमनात रुजली पाहिजे, यासाठी डॉ. मोहिते दांपत्याने प्रबोधनासाठी पुण्याच्या डॉ. वैशाली भारंबे यांना बोलवले. देह व अवयवदान विषयावर त्यांनी मार्गदर्शनही केले.  या प्रबोधनाचा परिणाम इतका सकारात्मक झाला, की मोहिते दांपत्यासह सुमारे ४७ जणांनी देह व अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. संबंधितांनी पुणे येथील झोनल ट्रान्सप्लान्ट को- ऑर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) नोंदणी केली आहे. त्यामध्ये ४४ जण अवयव, तर तिघे देहदान करणार आहेत. 

डॉ. सविता मोहिते म्हणाल्या, ‘‘शरिरातील काम करणारा अवयव दुसऱ्याला दान देणे ही यामागची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक जण अवयव दान करू शकतो. त्यासाठी मनातील भीती व गैरसमज दूर झाल्यास प्रत्येकात अवयव दानाविषयी विश्वास निर्माण होईल. या चांगल्या कार्यास समाजाचे पाठबळ वाढण्याची गरज आहे. मेंदू सोडून सर्व अवयव दान करता येतात. लिव्हर हा अवयव दुसऱ्याला दान केल्यानंतरही तो स्वतःच्या शरीरात पुनर्निर्माण होतो. जिवंतपणी एक किडनी व लिव्हरचा एक भाग दान करता येतो.’’

पाटणकर कुटुंबातील दहा जण सहभागी
कासारशिरंबे येथील पांडुरंग भाऊ पाटणकर व त्यांच्या पत्नी व मुले मिलिंद व नितीन, त्याचबरोबर सुना व नातवंडांसह कुटुंबातील आठ ते ७५ वयोगटातील दहा जणांनी अवयव दानाची इच्छा व्यक्त केली आहे. कुसूर (ता. कऱ्हाड) येथील विलासराव बंडोबा कदम या ७३ वर्षीय ज्येष्ठानेदेखील देहदानाचा संकल्प सोडला आहे.