नदी स्वच्छतेसाठी जैविक संप्रेरकांचा वापर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नदी स्वच्छतेसाठी "द आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेतर्फे जैविक संप्रेरकांचा (इको इन्झाइम) वापर करून वेगळा प्रयोग राबविला जाणार आहे. त्या माध्यमातून पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी आदी नद्यांमध्ये नाल्यांद्वारे सोडण्यात येणारे अशुद्ध पाणी रसायनमुक्त करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ अनिल कपूर यांनी रविवारी दिली. 

संत तुकारामनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात नदी स्वच्छतेसाठी आवश्‍यक जैविक संप्रेरकांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महापालिकेच्या अण्णा भाऊ साठे प्राथमिक विद्यालयात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी श्रीश्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धवन, जैविक संप्रेरक प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक संदीप पवार, प्रदेश समन्वयक राकेश माळी, वसंत सानप, उद्योजक शेषगिरी नर्रा, विभागीय समन्वयक राजू गायकवाड, सचिन नाईक उपस्थित होते. 

""श्रीश्री रविशंकर यांच्या प्रेरणेने 13 मे पासून जैविक संप्रेरकांचा प्रकल्प पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राबविला जाणार आहे. नद्यांमध्ये मिसळणाऱ्या नाल्यांमध्ये जैविक संप्रेरक टाकले जाईल. त्यामुळे नाल्यांद्वारे नदीत मिसळणारे पाणी शुद्ध होण्यास मदत होईल,'' असा दावा कपूर यांनी केला. ते म्हणाले, ""सामाजिक जबाबदारीतून हे काम हाती घेतले आहे. सुरवातीला नागरिकांना घरगुती स्वरूपात हे संप्रेरक तयार कसे करायचे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकेल, याबाबत माहिती दिली आहे. शहरातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी या प्रकल्पाची व्यापकता टप्प्याटप्प्याने वाढवत नेली जाणार आहे.'' 

माळी म्हणाले, ""पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, शाळा-महाविद्यालये, उद्योगांना या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. आमचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती देतील; तसेच प्रशिक्षणवर्ग घेऊन सोसायट्यांमध्ये मार्गदर्शन करतील.'' 

विभागीय समन्वयक राजू गायकवाड म्हणाले, ""नद्यांचे पाणी शुद्ध व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे एक हजार स्वयंसेवक या प्रकल्पावर काम करणार आहेत. वर्षभरासाठी हा प्रकल्प राबविला जाईल.''