भेंडीच्या उत्पादनात सचिनची ‘सेंच्युरी’

हेमंत देशमुख
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कर्जत - वृत्तपत्र, दूरचित्रवाहिनीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गाजत असताना अशा नकारात्मक विचारांना बाजूला सारत रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्‍यातील वावे येथील सचिन नीलकंठ दाभट यांनी शेतीत आमूलाग्र बदल केले आहेत. या सचिनने एक एकर भेंडीच्या शेतीत अत्यंत कमी कालावधीत भरघोस उत्पादन काढत ‘सेंच्युरी’ मारली आहे.  

या प्रयोगशील शेतीची चर्चा तालुक्‍यातील शेतकऱ्यांत असून, ती बघण्यासाठी रीघ लागली आहे. सर्वसाधारपणे भेंडीचे पीक हे ४५ दिवसांत येते. असे असताना शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे सचिन यांनी अवघ्या २३ दिवसांत भेंडीचे उत्पादन काढले. या प्रयोगात पुणे येथील ‘एस. बी. ॲग्रोटेक’चे अगरवाल आणि माजी अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

सचिन दाभट हे कृषी डिप्लोमाधारक आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीला व्यावसायिक दर्जा कसा प्राप्त होईल, यासाठी ते प्रयत्शील असतात. याअगोदर त्यांनी पपई, केळी, आले, भुईमूग अशा कोकणातील अपारंपरिक पिकांचे यशस्वी उत्पादन घेतलेले आहे. त्यांनी बीजप्रक्रिया करून सरी पद्धतीने भेंडीची लागवड केली. सेंद्रिय खताचा एकरी २० किलो वापर केला. रोपांची दमदार वाढ होऊन २२ व्या दिवशीच फळधारणा झाली. भेंडीला परदेशी बाजारपेठ मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.