गुंजालीचे यंदा ७० टन उत्पादन

जयसिंग कुंभार
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सांगली -  दुष्काळात वरदान ठरू शकेल अशा गुंजाली (ड्रॅगन फ्रुट) या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात चाळीस एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा पहिला हंगाम सुरू झाला आहे. पहिल्या वर्षी ७० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सरासरी दीडशे रुपये प्रतिकिलो असा घाऊक दर  मिळाला आहे. येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने पिकाची मुहूर्तमेंढ रोवून दुष्काळी भागाच्या अर्थकारणासाठी एक समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला.

सांगली -  दुष्काळात वरदान ठरू शकेल अशा गुंजाली (ड्रॅगन फ्रुट) या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात चाळीस एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा पहिला हंगाम सुरू झाला आहे. पहिल्या वर्षी ७० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सरासरी दीडशे रुपये प्रतिकिलो असा घाऊक दर  मिळाला आहे. येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने पिकाची मुहूर्तमेंढ रोवून दुष्काळी भागाच्या अर्थकारणासाठी एक समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला.

पन्नास वर्षांपूर्वी जिल्ह्यात द्राक्षाबागांच्या रूपाने दुष्काळात एक नगदी पिकाची लागवड सुरू झाली. त्यानंतर बोर, डाळिंबानेही मूळ धरले. सतत वाढता उत्पादन खर्च व उत्पादनामुळे कोसळलेली बाजारपेठ, निसर्गाचा लहरीपणा आणि सततची टंचाई यामुळे या तीनही पिकांबाबत आज शेतकरी धास्तावला आहे. त्यावर मात करण्यास म्हणून दुष्काळी भागाला कोणते पीक देता येईल या दृष्टीने जत तालुक्‍यात विकासाचे काम करणाऱ्या ‘येरळा’ने ड्रॅगन फ्रूटचा पर्याय पुढे आणला. त्याचे गुंजाली असे देशी नामकरण केले. रोपे देण्यापासून त्याच्या मार्गदर्शन व माहिती पुस्तिकेची सोय करून दिली. एकदा गुंतवणूक नंतर अत्यल्प पाणी आणि देखभाल खर्चात पीक भरघोस नफा देते. त्यावेळी आणि आजही पुण्या-मुंबईसह बेंगळुरू बाजारपेठेत प्रतिकिलो दोन-अडीचशे रुपये भाव मिळतोय. हा दर अगदी चाळीस रुपये  किलोप्रमाणे मिळाला तरी उसापेक्षा जादा उत्पन्न मिळू शकेल असे गणित मांडून ‘येरळा’ ने लागवडीला प्रोत्साहन व उत्तेजन दिले. सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथील खासगी नर्सरीतून प्रारंभी रोपे आणून स्वतःची नर्सरी विकसित केली. ही रोपे फेब्रुवारी २०१५ पासून जत तालुक्‍यातील निवडक शेतकऱ्यांना दिली. त्यातून प्रचार सुरू झाला. या प्रयत्नांना गोड फळे आलीत.

दीड वर्षातील लागवडीबद्दलचा अनुभवन नोंदवताना पांडोझरीच्या गायत्री पुजारी म्हणाल्या,‘‘एकरासाठी  पहिल्या वर्षी सव्वातीन लाखांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दुसऱ्या वर्षी फक्त वीस हजार रुपये मनुष्यबळास खर्च आला. औषध म्हणाल तर मुंग्या लागू नयेत यासाठी पाचशे रुपयांचे तीन किलो केवोलीन एवढेच. नर्सरीतूनही चांगला नफा मिळवला. सध्या  सरासरी दीडशे रुपये किलो असा दर मिळतोय. यंदाचे पहिले वर्ष असल्याने टनभर उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.’’ 

त्यांच्यासह जिल्हा व परिसरात यंदा दोन वर्षांत लागवड केलेल्या शेतकऱ्यांची नावे अशीः चंद्रकांत अंकलगी, उमेश किट्टद (जादरबोबलाद), योगेश पद्मन (मोरबगी), गायत्री पुजारी (पांडोझरी), रामानंद कन्नूर (कन्नूर), एम.एस.कायापुरे (बिळूर), राजू कारंडे (तिप्पेहळ्ळी), रमेश लिगाडे (उटगी), एस. आर. कोडग, भगवान  कोडग (औंढी), श्री. शेख (धावडवाडी), श्री. पोतदार (डफळापूर), जयकर साळुंखे (कमळापूर), कपिल राजपूत (बामणोली), ए. बी. पवार (तडसर), राजाराम देशमुख (वांगी), दत्तात्रय आडके, पांडुरंग सबनीस (चिंचणी), अंतू मुळीक (नेर्ली), संजय नलवडे (वायफळे), तानाजी वाघ (आरवडे), आर. एम. माने (सावर्डे), साहेबराव यमगर (बनपुरी), सिद्धाण्णा आदाणी (मारोळी), महादेव कोळेकर (कागवाड). 

यापैकी काहींनी यंदा फळे बाजारपेठेत पाठवायला सुरवातही केली. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी सुरू केल्याने त्या त्या परिसरात लागवड वाढणार आहे. द्राक्ष, डाळिंब, बोराप्रमाणेच गुंजालीही जिल्ह्याची नवी ओळख बनेल यात शंका नाही.

सध्या उत्पादनच कमी असल्याने गुंजालीला महानगरातील बाजारपेठ पुरेशी आहे. मात्र, प्रत्येक शहर, गावाची बाजारपेठ पूर्ण मोकळी आहे. त्याच्यावर प्रक्रिया करून ज्यूसच्या रूपातही ते उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी संस्थेने पुण्याच्या महिंद्र इंटरनॅशनल स्कूलशी संपर्क साधला आहे. या फळझाडासाठी लागणारे अत्यल्प पाणी आणि गुंतवणूक पाहता दुष्काळी भागासाठी हे पीक वरदान ठरेल. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांनी यावर  प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत.
- एन. व्ही. देशपांडे,  संचालक, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी