ऑइलमध्ये स्वतःच्या ब्रॅन्डचे स्वप्न साकारले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नामांकित कंपनीत मोठ्या रकमेचे पॅकेज आणि उच्च पदाची नोकरी असतानाही स्वतःची कंपनी असावी, या ध्यासातून संजय सोनवणे यांनी यशस्वी प्रवास केला. प्रत्येकाचे स्वप्न असेच असले, तरी ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी मेहनत व जिद्द असावी लागते. याविषयी अनुभव सांगताहेत, इंडिल्यूब पेट्रो स्पेशालिटी प्रा. लि.चे संचालक संजय सोनवणे....

आम्ही मूळचे सटाण्याचे; परंतु नंतर येवला आणि आता नाशिकमध्ये स्थायिक झालो. ‘एमबीए’नंतर नोकरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुरवातीपासून संधी मिळाली ती ऑइल कंपनीत. उत्कृष्ट कामाचा ध्यास असल्याने झपाट्याने स्वतःचा विकास होत गेला. यादरम्यान पुणे, मुंबई येथील ऑइल कंपन्यांत संधी मिळाली. एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर असताना स्वत:च्या कंपनीचा विचार मनात डोकावला. त्यानुसार २०११ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील जऊळके येथे इंडिल्यूब पेट्रो स्पेशालिटी प्रा. लि.ची स्थापन केली. मोठ्या पदाची अन्‌ पगाराची नोकरी असताना, कंपनी कशासाठी, असे सांगणारे जसे होते, तसे प्रोत्साहन देणारेही होते. कंपनीसमोर ऑइल क्षेत्रातील नामांकित ब्रॅन्ड होते.

त्यांच्याशी स्पर्धा करायची असेल तर स्वत:ला सिद्ध करावे लागणार होते. त्यासाठी मी तडजोड स्वीकारली नाही. ब्रॅन्ड निर्माण करायचा तो दर्जा आणि गुणवत्तेच्याच बळावर. कच्चे ऑइल आयात करून त्यावर प्रक्रिया करून ते बाजारात वाहने, यंत्रांसाठी वापरायचे होते. त्यामुळे दर्जा व गुणवत्तेचा कस लागणार होता. त्यासाठी आम्ही युरोपियन देशांत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर केला. त्यामुळे दर्जेदार अशी ऑइलनिर्मिती करणे शक्‍य झाले. अर्थात, बाजारातील नामांकित कंपन्यांच्या तोडीसतोड अशी ऑइलनिर्मिती केल्याने इंडिल्यूब ऑइलचे ब्रॅन्ड पसंतीला उतरले आणि जे स्वतः पाहिलेले स्वप्न होते, ते साकार झाले.
(शब्दांकन - नरेश हाळणोर)