सायकल ते अंबर दिव्यापर्यंतचा प्रवास!

हेमंत पवार
बुधवार, 29 मार्च 2017

सामान्य कुटुंबातील संकेत गोसावीची फिनिक्‍स भरारी; पोलिस उपअधीक्षकपदी निवड

सामान्य कुटुंबातील संकेत गोसावीची फिनिक्‍स भरारी; पोलिस उपअधीक्षकपदी निवड

कऱ्हाड - मोबाईल, टीव्ही, चित्रपट या प्रलोभनापासून दूर राहून अगदी साधी राहणी ठेवून सततच्या अभ्यासाच्या जोरावर पोलिस उपअधीक्षक होता येते, हे येथील संकेत गोसावी या युवकाने स्वकर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. सामान्य कुटुंबातील संकेतने आलेल्या अनेक संकटांची शिदोरी अनुभवत परावर्तित करून स्वतःवर विश्‍वास ठेवून वाटचाल करत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पोलिस उपअधीक्षकपद पटकावून तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. लहानपणापासून सायकलवरून सुरू असलेला त्याचा अंबर दिव्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.   

लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात येथील संकेत गोसावी याने सहायक पोलिस आयुक्त-पोलिस उपअधीक्षकपदी यश मिळवले. संकेतच्या मनात अधिकारी होण्याचे स्वप्न कसे निर्माण झाले, याची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. संकेत माध्यमिक शिक्षण घेताना कऱ्हाडला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आल्या होत्या. त्यांच्यासोबत साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख असल्याचे त्याला दिसले. ‘अधिकारी झाल्यावर राष्ट्रपतींच्या शेजारी जागा मिळते,’ हा विचार त्याच्या मनात घर करून राहिला. घरी आल्यावर बराच काळ विचार करून त्यावेळीच अधिकारी होण्याचा निर्णय त्याने घेतला. अभियांत्रिकी शिक्षणाचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांची पुस्तके त्याने वाचण्यास सुरवात केली. सलग १८ तास तो अभ्यास करायचा.

त्यादरम्यान होणाऱ्या जागरणामुळे अनेकदा तो आजारी पडायचा. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्याच्या डोक्‍यातून अभ्यासाचे वेड जात नव्हते. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे गाडी, मोबाईल असावा, असे त्याला वाटायचे. मात्र, आई-वडिलांनी तो हट्ट पुरवला नाही. त्यांनी तो निर्णय माझ्या ‘करियर’साठी घेतला होता. त्याचे फळ मिळाल्यावर आज किंमत कळाल्याचेही त्याने अभिमानाने सांगितले. 

या प्रवासाबाबत संकेत म्हणाला, ‘‘स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्यावर खेळ, चित्रकला याकडे दुर्लक्ष झाले. नातेवाईकांकडे जाणे बंद झाले. सतत अभ्यास करत राहिलो. या काळात बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रा. बी. एस. खोत, डॉ. सतीश घाटगे, श्री. रेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वेणूताई चव्हाण स्मृतिसदनातील अभ्यासिकेचाही उपयोग झाला. आई-वडिलांचे कठोर निर्णय मला यशापर्यंत घेवून गेले. पोलिसांत काम करताना समाजातील दु:खितांचे अश्रू पुसण्याचे काम मी करेन.

जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनी पहिल्यांदा स्वतःवर विश्‍वास ठेवावा. पुस्तके वाचावीत. टीव्ही, मोबाईल, चित्रपट यांसारख्या मायाजालात अडकू नये. प्रश्‍नपत्रिका सोडवाव्यात. सतत अभ्यासात मग्न राहावे.
- संकेत गोसावी, कऱ्हाड

Web Title: sanket gosavi success story