प्राथमिक शिक्षणातील ‘ब्रॅंड अॅम्बेसिडर’!

प्राथमिक शिक्षणातील ‘ब्रॅंड अॅम्बेसिडर’!

दुष्काळी भाग असूनही गुणवत्तेसह आधुनिकेत अग्रेसर; ३६५ दिवस भरली शाळा
 

सातारा - चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन...प्रोजेक्‍टर...शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत...३५ टॅब, २५ संगणक...स्पर्धा परीक्षांत राज्यस्तरावर यश... शुद्ध अन्‌ सुंदर लेखन... सहज बोलली जाणारी इंग्रजी भाषा... हे वर्णन काही इंटरनॅशनल स्कूलचे नव्हे... अत्यंत दुष्काळी गाव असलेल्या विखळे (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे. प्राथमिक शिक्षणातील ही शाळा ‘ब्रॅंड अम्बेसिडर’च.

खटाव तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडूजपासून ३० किलोमीटर अंतरावर विखळे गाव आहे. सांगली जिल्ह्यास ते जवळ असून, कायम दुष्काळी गाव. २०११ पूर्वी शाळेची स्थिती फारच दयनीय बनलेली. शाळेत अवघे ५० विद्यार्थी. मुलांना व्यवस्थित मराठी लिहिता, वाचता येत नव्हते. मुलांचा बौद्धांकच कमी असा समज गावकऱ्यांचा झालेला. याच दरम्यान प्रवीण इंगोले, रावसाहेब चव्हाण यांची बदली विखळे शाळेवर झाली. उमेदी, हरहुन्नरी असलेल्या या शिक्षकांनी ही स्थिती बदलण्याचा ध्यास धरला. पालकांचा विश्‍वास मुलांवर, शाळेवर निर्माण व्हावा, यासाठी गुणवत्तावाढीचा निर्णय झाला. त्यांना सोबत अमोल गुरव, सुवर्णा जगताप या शिक्षकांचीही लाभली. एक जीव होऊन, झोकून देऊन चौघांनी प्रयत्न सुरू केले. सकाळी साडेसात वाजता शाळेत पाऊल ठेवल्यानंतर रात्री साडेआठ वाजताच या शिक्षकांची पावले शाळेतून बाहेर वळत. ज्या मुलांना मराठी वाचता येत नव्हते, गणितांची आकडेमोड करता येत नव्हती, त्या मुलांत सुधारणा झाली.

शाळेची वाढलेली गुणवत्ता पाहून २०१२ पासून ग्रामस्थही पुढे आले. शाळेस भौतिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी दुष्काळी गाव असतानाही तब्बल ३५ लाखांचा लोकसहभाग उभा केला. शाळेची दुरुस्ती सुरू झाली, भिंतीवर चित्र स्वरूपात कथा अवतरल्या, मोकळ्या जागेत गवताचे लॉन केले गेले, महापुरुष, शास्त्रज्ञ, साहित्यांचा माहिती मुलांना

व्हावी, यासाठी शाळांच्या भिंतीवर त्यांची चित्रे रेखाटली गेली, जे पुस्तकांत आहे ते भिंतीवर दिसू लागले आणि बघता बघता शाळेचा कायापालट झाला. 
२०१३ मध्ये ३५ मुलांना टॅब देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली. तत्कालीन शिक्षण संचालक नामदेव जरग यांच्या हस्ते त्याचे वितरण झाले. अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी २५ संगणक शाळेत उपलब्ध आहेत. सव्वालाख रुपये किमतीच्या इंटरॅक्‍टिंग बोर्डवर मुलांना शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही, प्रोजेक्‍टर आहेत. शिवाय, जागतिक पातळीवर ज्ञान खुले करण्यासाठी संपूर्ण शाळा वाय- फाय बनविली आहे. २०१४ मध्ये चक्‍क ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा विक्रमही साधला आहे. दिवाळीत अवघी दोन दिवसांची सुट्टी या शाळेला असते. 

सांगलीतूनही येतात विद्यार्थी
२०११ मध्ये अवघी ५० पटसंख्या असलेल्या शाळेत आज १७५ विद्यार्थी दाखल आहेत. सांगली जिल्ह्यातील माहुली येथून ३५ मुले, तर खटाव तालुक्‍यातील मोठी गावे असलेल्या चितळी, मायणी, कलेढोण, पाचवड, ढोकळवाडी, पळसगाव या गावांतूनही मुले शिक्षणासाठी तेथे येत आहेत. सकाळी ७.४५ ते १०.१५ यावेळेत जादा तास घेऊन स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, तर रात्री ७.३० ते ८.३० यावेळेत रात्र अभ्यासिका घेतली जाते. प्रत्येक स्पर्धा परीक्षांच्या यशस्वी मुलांत या शाळेचा समावेश राहिला आहे. 

हे गवसले...
‘शैक्षणिक गुणवत्तेत’ जिल्ह्यात तीनदा प्रथम
‘प्रगत शैक्षणिक’मध्ये १०० टक्‍के प्रगत
‘शाळा सिद्धी’ उपक्रमात ‘अ’ श्रेणी
आयएसओ मानांकन प्राप्त शाळा
३५ लाख रुपयांचा लोकसहभाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com