यशस्वी उद्योजक ते नवोद्योजकांचा वाटाड्या

श्रीनिवास दुध्याल
मंगळवार, 18 जुलै 2017

प्रयत्न, प्रामाणिकपणा व चिकाटीमुळे आज मी उद्योगपती बनू शकलो. गरिबीची जाण आहे, त्यामुळे मार्गदर्शनाअभावी ध्येयापासून भरकटणाऱ्या नवोद्योजक व तरुण पिढीला प्रोत्साहन देऊन सोलापुरात उद्योग व उद्योजक वाढावेत, यासाठी व्याख्याने देतो. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सुवि सभागृह मोफत उपलब्ध करून देतो.
- विजय उडता, उद्योजक

विडी कामगार असलेल्या आईने दिलेल्या दोन हजारांतून मिळवला उद्योगात ‘विजय’

सोलापूर - विडी कामगार असलेल्या आईने १९८५ मध्ये कारखान्याच्या सोसायटीतून आणून दिलेल्या दोन हजार रुपयांतून ‘उडता प्लास्टिक्‍स’ची यशस्वी उभारणी केलेले, वास्तववादाच्या अधिष्ठानावरून विकासवादाकडे झेप घेणारे पूर्व भागातील यशस्वी उद्योजक विजय उडता आज अनेक नवोद्योजकांचे मार्गदर्शक बनून त्यांचा वाटाड्या बनले आहेत.  

विजय यांचे वडील ज्ञानेश्‍वर उडता यांचे नवीपेठेत छोट्याशा जागेत रेडिमेड कपड्यांचे दुकान होते. आई अंबूबाई विडी कामगार होती. घरचं जेमतेम उत्पन्न. वडिलांना दुकानात भाऊ पुरुषोत्तम यांची मदत मिळायची. विजय हे १९८४ मध्ये मेकॅनिकल ट्रेडमधून डिप्लोमा घेऊन बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या आईने विडी कारखान्याच्या सोसायटीतून काढून दिलेल्या दोन हजार रुपयांतून अकराशे रुपयांची इंजेक्‍शन मोल्डिंग ही सेकंड हॅंड बंद पडलेली हॅंडप्रेस्ड मशिन विकत घेतली व स्वत: दुरुस्त केली. पूर्व भागातील बुधवार बाजार येथील छोट्या जागेत १९८५ मध्ये पलंग व खुर्च्यांच्या पायांना लागणारे प्लास्टिक बूच बनवायचे काम सुरू केले. उत्पादनांत विविधता आणून प्लास्टिकच्या अनेक वस्तूंची निर्मिती सुरू केली. यात त्यांचे बंधू पुरुषोत्तम यांची खूपच साथ मिळाली. यानंतर १९९७ मध्ये विणकर वसाहत येथे जागा विकत घेऊन उद्योगाचा विस्तार केला. २००५ मध्ये एमआयडीसी येथे जागा घेऊन उत्पादनास सुरवात केली. येथून त्यांच्या व्यवसायाचा मोठा विस्तार झाला. यातूनच २०१५ मध्ये त्यांनी उडता टेक्‍स्टाईल मिल्सची यशस्वी उभारणी केली.

उद्योगात मुलगा व पुतण्याची साथ मिळू लागल्यानंतर मिळणाऱ्या वेळामध्ये त्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. नवोद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत ‘करिअर अँड कॅरेक्‍टर डेव्हलपमेंट’, ‘लाइफ स्किल्स फॉर लाइफ गोल्स अँड गोल सेटिंग मेथड’, ‘ध्येय मिळवण्याचे मार्ग’ या विषयांवर अनेक शाळा-महाविद्यालयांत मोफत व्याख्याने देण्यास सुरवात केली. आजही ते अशी मार्गदर्शक व्याख्याने देत आहेत. विणकर वसाहत येथील जुन्या कारखान्याचे रूपांतर ‘सुवि सभागृह’मध्ये करून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह मोफत उपलब्ध करून दिले जाते.

मेंटेनन्सचा खर्च भागावा यासाठी लग्नकार्य व इतर कार्यक्रमांना हे सभागृह भाड्याने दिले जाते. एकूणच, आईने दिलेल्या दोन हजार रुपयांतून त्यांनी निर्माण केलेले यशस्वी उद्योग व नवागतांना मार्गदर्शन करण्याची तळमळ प्रेरणादायी आहे.