कळसची नाळ जपलेले 'मुंबईकर मंडळ'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

शाळेसाठी दिली साडेसहा लाखांची बस

शाळेसाठी दिली साडेसहा लाखांची बस
सुपे - पोटासाठी मुंबईला गेलेली मंडळी गावाला विसरली नाहीत. तेथे त्यांनी "मुंबईकर मंडळ' स्थापन केले. गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सभासदांकडून दरमहा नाममात्र पाच रुपये जमा करण्यास सुरवात केली. याच "थेंबा थेंबां'चे तळे साचले आणि त्यातून मंडळाने आपल्या कळस (ता. पारनेर) या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी साडेसहा लाख रुपये किमतीची बस भेट दिली.

पारनेर तालुक्‍याच्या टोकाला असलेले कळस अतिशय छोटे गाव. शिक्षणाची गैरसोय, सततचा दुष्काळ आणि त्यामुळे रोजगार नसल्यामुळे पोट भरण्यासाठी गावातील अनेकांनी मुंबईचा रस्ता धरला. कोणतीही लाज न बाळगता मिळेल ते काम करायचे आणि घामाचा दाम मिळवायचा, अशीच जिद्द ठेवत त्यातील बऱ्याच जणांनी नाव कमावले. काही जणांनी आणखी मोठी भरारी घेतली. मुंबईकर झालेल्या या मंडळींनी आपली "कळसकर' ओळख मात्र विसरू दिली नाही. गावाशी नाळ जोडून ठेवताना 25 वर्षांपूर्वी, 1992 मध्ये त्यांनी कॉटन ग्रीन येथे "मुंबईकर मंडळ' स्थापन केले होते. मंडळाला अध्यक्ष किंवा पदाधिकारी नाहीत. सारेच सभासद-स्वयंसेवक. मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्यांनी कळसच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलसाठी बस दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्या-येण्याची सोय होणार आहे.

शाळेला बस देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे मच्छिंद्र गलांडे, हनुमंत गाडगे, विष्णू सरोदे, लक्ष्मण काणे, सचिन गाडगे, मारुती गाडगे, बाबाजी काणे, विठ्ठल गलांडे, गावचे उपसरपंच भर्तरी काणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळपकर, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थही उपस्थित होते.

मंडळाने सभासदांकडून जमा केलेल्या निधीतून आजपर्यंत गावात विविध विकासकामे केली. गावातील गणेश व मुक्ताई मंदिरांपासून "सरस्वतीची मंदिरे' विकसित केली. प्राथमिक शाळेला फरशी, माध्यमिक शाळेसाठी प्रयोगशाळा, ग्रंथालयासाठी मदत आणि विविध साहित्य दिले. त्यांच्या विविध कामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गावाला पर्यावरण विकास पुरस्कारही मिळवून दिला.