थेट डोंगराचे शुद्ध पाणी आणले गावात 

balayduri
balayduri
  • बलायदुरीच्या युवा सरपंचाची संकल्पना यशस्वी 
  • नैसर्गिक स्रोताचा प्रभावी वापर, साथीच्या आजारावर केली मात 
  • एका भगीरथाने पाण्यासाठी फोडला डोंगर 

इगतपुरी - प्रदूषणाचा त्रास आता शहरांपुरता मर्यादित न राहता अगदी गाव-पाड्यांवरही पोचला आहे. त्र्यंबकेश्‍वर परिसरातील त्रिंगलवाडी धरणालगतच्या प्रवाहालाही प्रदूषणाने ग्रासल्याने बलायदुरी गावालाही उन्हाळ्यात असाच साथीच्या आजाराचा विळखा पडत असतो. ग्रामस्थांची त्यातून सुटका करण्यासाठी येथील सरपंचांनी थेड डोंगरावरच्या नैसर्गिक प्रवाहाचे पाणी तळात आणले. त्यासाठी डोंगर फोडून पाईपलाईन केल्याने राजकीय नेत्यांचा हा प्रपंच तो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलाय. 

मुंबई-
आग्रा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेले बलायदुरी हे गाव. लोकसंख्या हजार ते बाराशे. गावात चार समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. गावाजवळील त्रिगलवाडी धरण व आठ महिने वाहती नदी. मात्र, पाण्याच्या वापरामुळे कायम साथीच्या आजाराचा सामना करावा लागतो. दूषित पाण्यामुळे आजार होतात. त्यामुळे युवा सरपंच कैलास भगत यांनी गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासनावर अवलंबून न रहाता गावालगत असणाऱ्या डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतातुन थेट गावापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी आणले. विशेष म्हणजे यामुळे केवळ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शुद्ध पाणीही मिळू लागल्याने गावातील साथीच्या आजारांचे समूळ उच्चाटनही झालं. 

दरम्यान तालुक्‍यात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्रोत बारमाही चालू असतात. त्यामुळे इतर ठिकाणी देखिल हा पॅटर्न राबविला, तर अशुद्ध पाण्याची समस्या दूर होईल व पाणी टंचाईही दूर होईल अशी अपेक्षा सरपंच कैलास भगत यांनी व्यक्त केली आहे. 

साधारणतः हजार ते बाराशे लोकसंख्येची वस्ती,धरण आणि नदी उशाला तरी कोरड घशाला, अशी गावीची अवस्था होती.धरणामुळे नदीपात्र अखंड वाहत असले, तरी हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी आवश्‍यक सामग्री नसल्याने गावकऱ्यांना नाईलाजास्तव हेच पाणी घरगुती पद्धतीने शुद्ध करून प्यावे लागत होते. त्यामुळे या गावाला नेहमी साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत होते. मात्र, गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर एक नैसर्गिक पाण्याच्या स्रोत असल्याने हेच पाणी जर ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले, तर गावाला शुद्ध व मुबलक पाणी मिळेल अशी संकल्पना सरपंच कैलास भगत यांनी ग्रामसेवक मच्छिंद्र भनगीर यांच्यासमोर मांडली. त्यांनीही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले. 

डोंगरावर असणाऱ्या पाण्याच्या झऱ्याची प्रथमतः स्वच्छता करून या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रयोग शाळेच्या सकारात्मक अहवालानुसार या झऱ्याला हौदाने बंदिस्त करण्यात आले. त्या ठिकाणाहून शंभर पाईप टाकून हे पाणी गावात आणले गेले. दरम्यान, पावसाळ्यातच दूषित पाण्याची समस्या अधिक असते. यामुळे जून महिना सुरु झाला की ग्रामस्थांना या डोंगराच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे साथीच्या आजाराचे समूळ उच्चाटन झाले आहे. 

गावाजवळून नदी वाहत असताना मात्र गावाला दूषित पाण्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी गावालगत असणाऱ्या डोंगरावरील नैसर्गिक स्रोताचे पाणी गावात आणण्याचे ठरवले. यानुसार थेट डोंगरातील पाणी गावातील पाणी पुरवठ्याच्या टाकीत टाकण्यात येते. यामुळे गावाची पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. तालुक्‍यात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी आहे. या डोंगरावर नैसर्गिक पाण्याचे स्रोत मुबलक प्रमाणात आहेत. हेच पाणी गावाची तहान भागवू शकते. 
- कैलास भगत (सरपंच) 

गावातील पाणीसमस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सरपंच कैलास भगत यांच्या संकल्पनेतून डोंगरावरील नैसर्गिक शुद्ध पाणी पाईपलाईन द्वारे गावात आणण्यास यश आले आहे. कोणताही पंप व वीज न वापरता हे पाणी नैसर्गिकरित्या गावात येते व ग्रामस्थांची तहान भागविते. 
- मच्छिंद्र भनगीर (ग्रामसेवक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com