सोनुर्लीची श्री देवी माऊली

सोनुर्लीची श्री देवी माऊली

सोनुर्ली (ता. सावंतवाडी) येथील श्री देवी माऊली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान लोटांगणाच्या जत्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. जिल्हाच नाही तर राज्यासह गोवा, कर्नाटकातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. आता ग्रामस्थांनी उभारलेले देखणे मंदिर, इथला निसर्गरम्य परिसर यांमुळे हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ बनले आहे.

सावंतवाडी तालुक्‍यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले सोनुर्ली हे गाव. दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा संपूर्ण राज्यभर लौकिक आहे. जागृत देवस्थान व नवसाला पावणारी अशी या देवीविषयी भाविकांच्या मनात श्रद्धा आहे. या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला मोठी गर्दी असते.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेले हे देवस्थान. सोनुर्ली हे गाव सावंतवाडीपासून १८ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. तर गावची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. श्री देवी माऊलीच्या कृपेमुळेच हा गाव भरभराटीला आल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी श्री देवी माऊलीचे भव्य दिव्य मंदिरही उभारण्यात आले आहे. कर्नाटकमधील मंदिर कलाकुसरीच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात आले असून नक्षीकामामुळे हे मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाची चाहूल कोजागरी पौर्णिमेच्या जागराने होते; मात्र प्रत्यक्ष जागराची सुरवात कार्तिक पौर्णिमेला होते. या वेळी लोटांगण घालण्याचा नवस बोलण्याची प्रथा आहे. 

रात्री अकरानंतर देवीला लोटांगणे घातली जातात. पुरुष उघड्या अंगाने जमिनीवर तर महिला भाविक उभ्याने केस सोडून लोटांगणे घालतात. मंदिरला प्रदक्षिणा घालून लोटांगणे पूर्ण करण्यात येते. त्याचवेळी देवीची व इतर देवाची तरंगे आधारासहित फिरतात हा क्षण अनुभवण्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. दुसऱ्या दिवशी तुलाभाराचा कार्यक्रम होतो. त्यानंतर अवसार उभे राहून भाविकांना कौल देतात. हे सर्व कार्यक्रम झाल्यावर सर्व ग्रामस्थ, भाविक तरंग काठीसह मिरवणुकीने कुळ घराकडे जाऊन त्या ठिकाणी तरंग काठीची विधिवत पूजा केली जाते. गावातील ग्रामस्थ उत्सवात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून दक्ष असतात.

दक्षिण कोकणचे पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा महिमा अगाध आहे, अशी भाविकांची प्रचिती आहे. त्यामुळेच कोकणसह महाराष्ट्रातील इतर काही भागात, कर्नाटक, गोव्यातूनही भाविक श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईहून गोव्याकडे जाणारा पर्यटक असो वा येणारा वाटसरू तो श्री देवी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी सोनुर्लीला नक्कीच जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com