आंबोलीतील ‘तो’ मृतदेह गडहिंग्लजच्या शिक्षकाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - कावळेसाद येथे खून करून टाकलेल्या मृतदेहाची आज ओळख पटली. गडहिंग्लज येथील बेपत्ता शिक्षक विजय गुरव (वय ४६, रा. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अभिषेक याने मृतदेह हा आपले वडील विजय गुरव यांचाच असल्याचे आज ओरोस येथे हातातील हिरव्या रंगाचा धागा व बोटावरून मृतदेहाच्या पाहणीनंतर सांगितले.

सावंतवाडी - कावळेसाद येथे खून करून टाकलेल्या मृतदेहाची आज ओळख पटली. गडहिंग्लज येथील बेपत्ता शिक्षक विजय गुरव (वय ४६, रा. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अभिषेक याने मृतदेह हा आपले वडील विजय गुरव यांचाच असल्याचे आज ओरोस येथे हातातील हिरव्या रंगाचा धागा व बोटावरून मृतदेहाच्या पाहणीनंतर सांगितले.

त्यासाठी ओरोस येथील रुग्णालयातून डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले असून, ते उद्या (ता. १३) पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. त्याची शहानिशा झाल्यानंतरच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कावळेसाद येथे पर्यटकांना रक्ताच्या डागांसह मृतदेह ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या होत्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती पर्यटकांनी तेथील स्थानिक व्यावसायिक व पोलिसपाटील यांना दिल्यानंतर एक हजार फूट खोल दरीतून शनिवारी (ता. ११) मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मागे घातपात असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. दरीत मिळालेल्या मृतदेहावर फक्त बनियनच असल्यामुळे व मृतदेहाचा चेहराही स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांना ओळख पटविताना अवघड होत होते. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथे आणण्यात आला होता; मात्र काही कारणास्तव येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तो ओरोस येथील रुग्णालयात नेला. 

दरम्यान, आज गडहिंग्लज येथील विजय गुरव हे शिक्षक बेपत्ता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आंबोलीतील मृतदेह पाहण्यासाठी त्यांचा मुलगा व नातेवाईक ओरोस येथे आले. ओरोस येथील रुग्णालयात केलेल्या पाहणीत मुलगा अभिषेक याने वडिलांच्या हातात असलेल्या दोऱ्यामुळे, तसेच बोटांवरून मृतदेह ओळखला. मृतदेह चार दिवसांपूर्वीचा कुजलेल्या अवस्थेत होता. प्लास्टिकची पिशवी डोक्‍याला बांधली होती, तर डोक्‍याचा चेंदामेंदा केलेला होता. रक्त सांडू नये म्हणून प्लास्टिक पिशवी बांधून ओळख लपविण्यासाठी चेहरा विद्रुप केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. 

खून पैशासाठी केल्याचा संशय 
खिशात असलेले २८ हजार व हातातील सोन्याच्या अंगठ्या यासाठीही खून केल्याचा संशय आता बळावत आहे. त्यांच्या खिशात एटीएम कार्डही होते. तसेच या खुनामागे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

गुरव कोणाबरोबर गेले?
गुरव कुटुंबीय भडगावपैकी चोथेवाडी येथे त्यांच्या शेतातील घरात राहतात. ६ नोव्हेंबरला रात्री ते त्यांच्या घरातच मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. ते निघून गेल्यानंतर ते झोपी गेले. अकराच्या सुमारास कोणी तरी त्यांना बोलावण्यास आले. त्यांच्यासोबत ते बाहेर जाऊन येतो म्हणून निघून गेल्याचे समजते; पण ते कुणासोबत गेले, हे त्यांच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले नाही. ते लवकर घरी न परतल्याने गडहिंग्लज पोलिसांत त्यांचा मुलगा अभिषेकने बेपत्ताची वर्दी दिली. गुरव हे हिडदुग्गी हायस्कूल येथे १९९५ पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते.

रक्त नमुने आज पाठविणार
कावळेसाद ठिकाणी कठड्यावर पर्यटकांना निदर्शनास आलेले रक्ताचे डाग हे विजय गुरव यांचेच आहेत, की ते दुसऱ्या कोणाचे अथवा प्राण्यांचे आहेत का, हे नेमके पाहणे आवश्‍यक आहे. आज विजय गुरव यांचे शवविच्छेदन करून रक्त नमुने घेण्यात आले आहेत. उद्या (ता.१३) ते पुणे येथे डीएनए तपासणीसासठी पाठविण्यात येणार आहेत. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अरुण जाधव करीत आहेत.
 

Web Title: Sindhudurg News Crime report