१७२ रुग्णालयांची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

रत्नागिरी - म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्री-भ्रूण हत्याकांडानंतर राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील १७२ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. कायद्याने दिलेल्या निकषांचे काटेकोर पालन होते की नाही, याची पाहणी केली जाणार आहे.

अटी-शर्तींना बगल दिल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. बनावट डॉक्‍टरही त्यांच्या हिटलिस्टवर आहेत. याला जिल्हा शल्यचिकित्सक बी. डी. अरसुळकर यांनी दुजोरा दिला.

म्हैसाळ येथे स्त्री-भ्रूण हत्याकांडाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. राज्यात हे रॅकेट पसरले असण्याच्या शक्‍यतेने या प्रकाराचे उच्चाटन करण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भरीस भर म्हणून दौंड-पुणे येथे डॉ. शिंदेदेखील गर्भलिंग चाचणी करताना सापडले. विशेष म्हणजे ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय नोकरीत आहेत. गेली दोन वर्षे ते गैरहजर आहेत. त्यामुळे डॉ. शिंदे यांची सेवा रद्द करण्याबाबत जिल्हा रुग्णालयाने शासनाला अहवाल दिला आहे. बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणे, तसेच बनावट डॉक्‍टरांचे प्रमाण वाढल्याने शासनाने आता कडक पावले उचलली आहेत. 

वैद्यकीय सेवा देताना ती लोकांच्या जीवावर बेतू नये, त्यांच्यावर प्रयोग होऊ नये, या उद्देशाने सर्व खासगी रुग्णालयांची कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी डॉक्‍टरांची पदवी, प्रमाणपत्र आदींची तपासणी केली जाणार आहे. हॉस्पिटलच्या जागेपासून ते तेथे किती खाटा आहेत, योग्य आरोग्य सेवा पुरवली जाते का, सर्व नियमांचे पालन केले जाते का, याची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये कसूर केल्याचे आढळल्यास हॉस्पिटल बंद करण्यापर्यंतचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.

तालुकास्तरावर पथके स्थापणार
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरावर पथके तयार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आदींचा समावेश असणार आहे. कायद्याने त्यांना अनेक अधिकार प्राप्त होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे घसरलेल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात बोगस डॉक्‍टरांची अंदाजित संख्या ३२ आहे. त्याअनुषंगाने पोलिस आणि आरोग्य खात्याच्या पथकाकडून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या नाड्या आवळण्यात येणार आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये सावर्डे आणि रत्नागिरीत दोन प्रकार उघड झाले.

Web Title: 172 hospital cheaking