पाचल बाजारपेठेतील दोन दुकाने भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

राजापूर : तालुक्‍यातील पाचल बाजारपेठेत बुधवारी (ता. 7) दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये साडेचार लाखांची हानी झाल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले. आजचा दिवस आठवडा बाजाराचा असल्याने खरेदीसह विविध कामांसाठी आलेल्या लोकांनी आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. अनेक लोकांनी धावाधाव करून पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्‍यात आणता आली; अन्यथा लगतच्या दुकानांनाही आगीची झळ बसली असती. सकाळी पावणेअकराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. शॉटसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

पाचल बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी राजन लब्दे व प्रसाद पाथरे यांची दुकाने भस्मसात झाली. लब्दे यांचे चार लाखांचे, तर पाथरे यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले. आगीचे वृत्त कळताच लोकांनी दुकानांकडे धाव घेतली. दोन्ही दुकानांत स्टेशनरी, कटलरी यांसह फटाके आदी होते. फटाक्‍यांच्या स्फोटाने आग अधिकच भडकली. राजन लब्दे यांच्या दुकानाच्या मागील बाजूला त्यांचे बंदिस्त गोदाम आहे. तेथे फटाक्‍यांचे मोठे आवाज येत होते. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आग विझवण्यासाठी पाणी मिळण्यात अडथळे आले. म्हणून दुकान परिसरातील वीजवाहिनी बंद ठेवून उर्वरित वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पाचलमधील घराघरांतून महिला, पुरुषांनी पाण्याची भांडी घेऊन दुकानांकडे धाव घेतली. आग शेजारील दुकानांत पसरू नये, याची खबरदारी घेण्यात आली. लगतच्या विहिरीवरील पंप व नळ कनेक्‍शन यातून पाणी मिळविण्यात आले. आगीने वेढलेल्या दोन्ही दुकानांतील तसेच शेजारील दुकानांतील माल बाहेर काढण्यात आला.

घटनास्थळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक ओठवणेकर हे सहकाऱ्यांसह हजर झाले. राजापूर पालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

तिसऱ्यांदा बाजारपेठेत आग
यापूर्वी दोन वेळा पाचल बाजारपेठेत आग लागली होती. 2001 ला सर्वांत भीषण आगीत पाच ते सहा दुकानातील माल जळून खाक झाला होता. आता तिसऱ्यावेळी लागलेली आग तासाभरात आटोक्‍यात आणणे शक्‍य झाले.

आगीच्या अशाही झळा
दोन्ही दुकानांना लागलेली आग विझवण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याकरिता एक भाजीविक्रेती महिला मदतीसाठी धावली; मात्र त्यादरम्यान तिचा गल्लाच कुणीतरी लांबविला. आगीच्या अशा विपरीत झळाही तिने अनुभवल्या.