३७० शिक्षकांचे नाहरकत प्रस्ताव रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी आंतरजिल्हा बदलीचे नाहरकत प्रमाणपत्र दिलेल्या ३७० शिक्षकांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी रद्द केले आहेत. मात्र आंतरजिल्हा बदलीसाठी दोन्ही ठिकाणची नाहरकत प्रमाणपत्रे प्रक्रिया पूर्ण झालेल्या ५४ शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रस्ताव रद्द झालेल्या ३७० शिक्षकांना शासनाच्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अर्ज करावा लागणार आहे.

कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये सलग पाच वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकाला आंतरजिल्हा बदलीने स्वतःच्या जिल्ह्यात जाता येते. यासाठी दोन्ही जिल्हा परिषदांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्‍यक असते. २०१६ पूर्वी आंतरजिल्हा बदली प्रस्ताव दिलेल्या मराठी माध्यमांच्या ४२ शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषदांची नाहरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाली होती. उर्दू माध्यमाच्या १२ शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषद प्रशासनाची नाहरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाली होती. अशा ५४ शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मेमध्ये त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार या ५४ शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यासाठीच्या हालचाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील शिक्षकांचा मोठा भरणा आहे. आंतर जिल्हा बदलीने सिंधुदुर्गातून स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असलेल्या ३७० शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांना धक्का दिला आहे. ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी एकतर्फी ना हरकत प्रमाणपत्रामुळे रखडलेले प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले होते. यापुढील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३७० शिक्षकांचे आंतर जिल्हा बदलीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेली नाहरकत प्रमाणपत्रे रद्द ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७० शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन पद्धतीच्या बदली प्रक्रियेत सामोरे जावे लागणार आहे; मात्र या शिक्षकांना प्राधान्यक्रमाने बदली देण्यात येणार असल्याने संबंधित शिक्षकांनी बदलीसाठी तात्काळ ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: 370 teachers Nervousness proposal canceled