धान्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्यविक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळाली.

गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळाली.

अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात तीन दिवस खाद्य महोत्सव भरविण्यात आला. गेल्या वर्षीपासून कृषी खात्याच्या उपविभाग चिपळूणतर्फे धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्यावर्षी हा महोत्सव चिपळुणातील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून यावर्षी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अण्णासाहेब खेडकर क्रीडासंकुलात तो हलवण्यात आला. या महोत्सवामध्ये ६० शेतकरी व फळ प्रक्रिया उद्योजक आणि ६ महिला बचत गट सहभागी झाले होते. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पोचण्याची संधी या धान्य महोत्सवामुळे मिळाली. बहुतेक शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतीमालापैकी ९० टक्के माल विकला गेल्याने महोत्सवात सहभागी झालेले शेतकरी समाधानी होते.

या धान्य महोत्सवात ३२९.५० क्विंटल तांदूळ, ७८.७० क्विंटल नाचणी, १०७ क्विंटल गहू, ७२.५० क्विंटल ज्वारी, ३७.८५ क्विंटल कडधान्ये, ९६.६५ क्विंटल अन्य धान्ये व कडधान्ये उपलब्ध विक्रीसाठी उपलब्ध होती. कलिंगड, आंबा या फळांसह महिला बचत गटांनी तयार केलेली पापड, विविध पिठे, लोणची आदी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. आमदार सदानंद चव्हाण, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, चार तालुक्‍यांतील शेतकरी, ग्राहक यांनी या खाद्य महोत्सवाला भेट दिली.  

महोत्सवात तीन शेतकरी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सगुणा तंत्रज्ञानाने १९४.४०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके विक्रमी भात उत्पादन घेणारे शेतकरी मिलिंद वैद्य यांनी सगुणा भात उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. शिरीष तेरखेडकर यांनी खरेदीदार व विक्रता संमेलन या विषयावर, तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवड कोकणातील हिरवे सोने या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या महोत्सवात एकूण १४ लाख रुपयांची उलाढाल झाली. कृषी विभागातर्फे आंबा पिकावरील रोग कीड नियंत्रण आणि नरेगा फळबाग व वृक्षलागवड या विषयांवरील माहितीपुस्तिका वाटण्यात आल्या. 

कोकणात पारंपरिक पद्धतीने पडीक जमिनीवर बांबू लागवड केली तर एकरी दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते. कोकणातील हवामान बांबू लागवडीसाठी योग्य आहे. बांबूच्या विक्रीबाबत मार्केटची साखळी तयार असल्याने उत्पादनाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांला चिंता करण्याचे कारण नाही.
- मिलिंद पाटील, बांबू शेती करणारे शेतकरी.

* ६० क्विंटल भाजीपाला, फळांची विक्री
* ६० शेतकरी, ६ महिला बचत गट सहभागी
* ९० टक्के माल संपल्याने शेतकरीही खूश
* घरगुती उत्पादनांचीही जोरदार विक्री