रस्ते अपघातात वर्षभरात ७२ बळी

रस्ते अपघातात वर्षभरात ७२ बळी

सिंधुदुर्गातील स्थिती - तब्बल ३५५ अपघातांची नोंद

कणकवली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल ७२ जणांचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अथवा  मद्यप्राशन करून बेदकारपणे वाहन चालविल्यामुळे ३५५ अपघात झाल्याची नोंद असून पाचशेहून अधिक प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. 

गतवर्षी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात महामार्गावरील खड्ड्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक अपघात झाले आहेत. या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच राज्य महामार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. परिवहन विभागातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानही राबविले जाते. तरीही अपघाताचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. महामार्गावरील धोकादायक वळणे, निसरडे रस्ते दर्शविणारे फलकही लावण्यात आले आहेत. तरीही वाहनांच्या वेगावर नियंत्रण न ठेवता वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत आहे.

राज्यभरात ६३ हजार अपघात होऊन १३ हजार प्रवाशांचा मृत्यू झाले आहे.   एकट्या  सिंधुुदुर्ग जिल्ह्यात ३५५ अपघातात ७२ जणांचे बळी गेले  आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुक होते. विशेषतः गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यातच मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचेही दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून महामार्गालगत ५०० मीटर अंतरावरील दारू विक्री व्यवसाय तसेच बीअर बार आणि रेस्टाॅरंट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. रस्ता वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मोठी यंत्रणा नसल्याने वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे सातत्याने उल्लंघन होत आहे. परिणामी रस्ता वाहतुकीतील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस 
वाढत आहे. 

असे आहे अपघातांचे प्रमाण

 निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण - ७० टक्के

 पादचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात - ८ टक्के

 रस्त्याच्या सदोष बांधणीमुळे - ७ टक्के
 रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात - ६ टक्के

 इतर कारणी - ९ टक्के

गंभीर जखमींना आधार गोव्याचा
जिल्ह्यात रस्ते अपघातात गंभीर जखमी अपघातग्रस्ताला एक तर गोवा येथे किंवा कोल्हापुरात उपचारसाठी पाठवावे लागते. गोवा येथे रुग्णाच्या नातेवाईकांना अनेकदा वाईट अनुभव येत आहेत. पण जिल्ह्यात प्रभावी उपचार यंत्रणा नसल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे अपघातग्रस्तांचे आधारस्थान बनले आहे.

यंदा महामार्गाची दुरवस्था होणार ?
गतवर्षी मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली होती. यात अनेकाचे बळी गेले, काहीजण गंभीर जखमी झाले. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी किंवा नूतनीकरणासाठी यंदा निधी मिळालेला नाही. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे देखभाल दुस्तीही थांबली आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात महामार्गाची दुरवस्था होणार हे सत्य आहे.

ट्रामाॅ केअर सेंटर धूळ खात
शासनाने जिल्ह्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ट्राॅमा केअर सेंटर मंजूर केले. मात्र लाखो रुपयांची यंत्रणा उभारून तज्ञांअभावी हे ट्राॅमा केअर सेंटर बंद आहे. जिल्ह्यातील महामार्गालगतच्या शासकीय रुग्णालयात अपघातग्रस्त कोणतीही ठोस उपचार यंत्रणा नाही. जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणाही कुचकामी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com