सर्पदंश झालेल्याचा औषधाअभावी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

ग्रामस्थांचा आरोप - हिर्लेवाडीतील घटना - पुढच्या उपचाराला न पाठविल्याचा आरोप

आचरा - आचरा हिर्लेवाडी येथील सुनील गोपाळ पेडणेकर (वय ४२) यांना आज कोब्रा जातीच्या नागिणीने दंश केला. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील औषधे नसतानाही रुग्णाला पुढील उपचारासाठी न पाठविता आरोग्य केंद्रात ठेवल्यानेच पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांचा आरोप - हिर्लेवाडीतील घटना - पुढच्या उपचाराला न पाठविल्याचा आरोप

आचरा - आचरा हिर्लेवाडी येथील सुनील गोपाळ पेडणेकर (वय ४२) यांना आज कोब्रा जातीच्या नागिणीने दंश केला. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील औषधे नसतानाही रुग्णाला पुढील उपचारासाठी न पाठविता आरोग्य केंद्रात ठेवल्यानेच पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.

आचरा-हिर्लेवाडी येथे राहणारे सुनील पेडणेकर हे गवंडीकाम करतात. २० दिवसापूर्वी त्यांना मुलगा झाल्याने २४ जुलैला बेळगाव येथे होणाऱ्या मुलाच्या बारशाच्या खरेदीसाठी ते आज सकाळी पावणेनऊ वाजता घर बंद करून घराच्या पडवीवर चावी ठेवण्यासाठी गेले. तेथे असलेल्या कोब्रा जातीच्या नागिणीने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. त्यांनी कळवळून आरडाओरड केल्यावर शेजारच्या ग्रामस्थांनी तसेच त्यांच्या भावंडांनी घराकडे धाव घेतली आणि त्या नागिणीला मारले. 

नागिणीने दंश केल्याचे लक्षात येताच पेडणेकर यांनी धावतच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

हिर्लेवाडी ग्रामस्थ आणि रामेश्‍वर विकास सोसायटीचे संचालक संजय मालवणकर यांनी रुग्णाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; पण सर्पदंशावरील आवश्‍यक औषधेच आरोग्य केंद्रात नव्हती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले इंजेक्‍शनही गावातील एकाही मेडिकल स्टोअर्समध्ये मिळाले नाही. आरोग्य केंद्रात आवश्‍यक औषधे नसताना तसेच रुग्णवाहिका आली असतानाही रुग्णाला तीन तास आरोग्य केंद्रातच ठेवण्यात आले. त्यामुळेच पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले की, रुग्णालयात सर्पदंशावरील ३० लस उपलब्ध आहेत. कोब्रा जातीचा सर्प चावल्यानंतर २०-२५ मिनिटे उपचारासाठी असतात. या काळात जे उपचार करणे आवश्‍यक होते. ते सर्व उपचार आम्ही केले, असे स्पष्ट केले. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका कालच ऑइल लिकेजमुळे बंद पडल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील ४५ महसुली गावांचा समावेश असलेल्या आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रास चांगले वाहन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रुग्णालयाचे वाहन सुरू असते तर पेडणेकर यांना तत्काळ उपचारासाठी अन्यत्र नेता आले असते, असे ग्रामस्थांनी 
सांगितले.

रुग्ण सव्वा दहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. सलाइनमधून दहा सर्पदंश प्रतिरोधक इंजेक्‍शन दिली. १०८ रुग्णवाहिकेस दूरध्वनीही केला. आमच्याकडून उपचारात कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही.
- डॉ. शामराव जाधव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा

काळाचा घाला...
सात दिवसांनी होणाऱ्या मुलाच्या बारशाच्या तयारीत असलेल्या सुनील पेडणेकर यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन भाऊ, बहीण, भाचे असा परिवार आहे. माजी सरपंच राजन गावकर यांचे ते मेहुणे होत.