भाजपच्या पराभवास बाळ माने जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाला जिल्हाध्यक्ष बाळ माने कारणीभूत आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन नव्या चेहऱ्याला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव गवळी यांनी रविवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत केली.

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाला जिल्हाध्यक्ष बाळ माने कारणीभूत आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन नव्या चेहऱ्याला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव गवळी यांनी रविवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत केली.

चिपळूण विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर मी पक्ष बांधणीचे काम करीत होतो. जिल्हाध्यक्ष म्हणून मानेंची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मला चिपळुणात लक्ष घालू नका, अशी सूचना केली. जिल्ह्यातील मतदारांना खोटी आश्‍वासने देऊन त्यांची दिशाभूल केली. जिल्हा परिषदेत भाजपचे 9 सदस्य होते. यावेळी एकसुद्धा नाही. माने आपल्या पत्नीला निवडून आणू शकले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी कार्यकर्ते इच्छुक नसताना त्यांच्या गळ्यात उमेदवारी मारली. खेर्डी पंचायत समिती गणात भाजपच्या उमेदवाराला दबाव टाकून मानेंनी माघार घ्यावी लावली. त्यांचे काम नियोजनशून्य आहे, असा आरोप गवळी यांनी केला.

माझ्यामुळे जिल्ह्यात विकासनिधी आला; मात्र त्याचे श्रेय मानेंनी घेतले. कार्यकर्त्यांमध्ये जुना-नवा वाद लावून ठेवण्याचे काम त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण यांच्याकडे बाळ मानेंच्या तक्रारी केल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर लवकरच बदल केले जातील, असे आश्‍वासन त्यांनी मला दिले आहे. मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. मानेंना पदावरून हटविण्याऐवजी त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

रमेश कदमांचा पक्षाला फायदा नाही
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम भाजपमध्ये आले; मात्र त्यांचा पक्षाला काहीही फायदा झालेला नाही, असे माधव गवळी यांनी सांगितले. मानेंच्या सूचनेमुळे मी उघडपणे सक्रिय नव्हतो; मात्र मतदारसंघात माझा लोकसंपर्क अजूनही कायम असल्याचा दावा त्यांनी केला.