भीम हत्तीस पुन्हा आणण्यात ‘रिस्क’

अमोल टेंबकर
बुधवार, 12 एप्रिल 2017

उपवनसंरक्षक रमेशकुमार - प्रशिक्षित माहुताची भासणार गरज 

उपवनसंरक्षक रमेशकुमार - प्रशिक्षित माहुताची भासणार गरज 

सावंतवाडी - हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी आहे. त्यामुळे हत्ती हटाव मोहिमेदरम्यान पकडण्यात आलेला भीम माणसाळलेला असला तरी त्याला पुन्हा या ठिकाणी आणण्यात रिस्क आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याबाबत योग्य तो विचार करावा, असे मत येथील वन विभागाचे मावळते उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्याला आणायचाच असल्यास स्थानिक किंवा जिल्ह्यातील माहुताला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे; परंतु तो या ठिकाणी एकटा राहू शकत नाही. त्यामुळे याबाबत लोकप्रतिनिधींनी योग्य तो विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

येथील वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. रमेशकुमार यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. ते येत्या दोन दिवसांत आपला कार्यभार सोडणार आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात हत्तीचे संकट मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीचा आकडा लक्षात घेण्यापेक्षा जीवितहानी रोखणे संकट होते. त्यामुळे हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेत तीन हत्तींना पकडण्यात यश आले; परंतु दोन हत्तींना आपण वाचवू शकलो नाही हा आपल्या वन विभागाचा मोठा तोटा आहे. या मोहिमेदरम्यान यशस्वीरीत्या पकडण्यात आलेल्या ‘भीम’ला माणसाळविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सद्यःस्थितीत तो प्रशिक्षण घेत आहे. त्याला या ठिकाणी आणणे गरजेचे आहे.

 तत्पूर्वी येथील स्थानिक किंवा जिल्ह्यातील व्यक्तीला माहुताचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठविणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास भीमला जिल्ह्यात आणल्यानंतर त्याला सांभाळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.
भीम सद्यःस्थितीत ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे त्या ठिकाणी अन्य दोन हत्ती आहेत; मात्र या ठिकाणी त्याला एकटाच आणल्यानंतर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी असल्यामुळे ते सोयीचे होणार नाही; मात्र त्यासाठी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘या ठिकाणी दोडामार्ग भागात आतासुद्धा हत्तींचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत त्यांच्याकडून कोणतेही नुकसान होऊ नये, ते वस्तीत घुसू नयेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’ 

जिल्ह्याचे प्रेम प्रेरणा देणारे 
या वेळी श्री. रमेशकुमार म्हणाले, ‘‘अधिकारी म्हटला, की बदलीची प्रक्रिया येतेच; परंतु सिंधुदुर्गात काम करताना खूप आनंद वाटला. या ठिकाणची माणसे, निसर्ग सौंदर्य आणि संस्कृती यांमुळे बरेच काही शिकता आले. त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा जिल्हावासीयांचे प्रेम मला निश्‍चितच प्रेरणा देईल.’’