मोबाइल कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएलचीही उडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

कणकवली - मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण, डाटा फ्रीच्या योजना स्पर्धेत भारतीय दूरसंचार निगमनेही उडी घेतली आहे. इतर कंपन्यांबरोबरच 339 रुपयांत अमर्यादित कॉल आणि डाटा देण्याची योजना जाहीर केली आहे. बीएसएनएलचे नेटवर्क गावागावांत असल्याने या योजनेत ग्राहक निश्‍चितपणे जोडले जातील, अशी अपेक्षाही बीएसएनएल अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. 

कणकवली - मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण, डाटा फ्रीच्या योजना स्पर्धेत भारतीय दूरसंचार निगमनेही उडी घेतली आहे. इतर कंपन्यांबरोबरच 339 रुपयांत अमर्यादित कॉल आणि डाटा देण्याची योजना जाहीर केली आहे. बीएसएनएलचे नेटवर्क गावागावांत असल्याने या योजनेत ग्राहक निश्‍चितपणे जोडले जातील, अशी अपेक्षाही बीएसएनएल अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. 

खासगी मोबाइल कंपन्यांनी अमर्यादित कॉल आणि डाटा देण्याची तीव्र स्पर्धा सुरू केली आहे. सध्या इंटरनेटचा वापर युवा वर्गासह सोशल मीडिया वापरणाऱ्यांना गरजेचा झाला आहे. कमीत कमी किमतीत जेवढा जास्त डाटा दिला जाईल, त्या कंपनीकडे ग्राहक ओढला जात आहे. यात ग्राहक टिकविण्यासाठी भारतीय दूरसंचार निगमनेदेखील प्लॅन जारी केला आहे. 

बीएसएनएलच्या 339 रुपयांच्या योजनेत बीएसएनएल ग्राहक बीएसएनएल ग्राहकांशी अमर्यादित बोलू शकणार आहेत. तसेच इतर नेटवर्कसाठी दररोज 25 मिनिटांचे संभाषण मोफत मिळणार आहे. त्यानंतरचे कॉल 25 पैसे प्रतिमिनिट दराने आकारण्यात येणार आहेत. याखेरीज प्रत्येक दिवशी 2 जीबी डाटा दिला मोफत दिला जाणार आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. 

दरम्यान, दुसऱ्या 99 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना बीएसएनएल ते बीएसएनएलच्या लोकल आणि एस.टी.डी नेटवर्कवर अमर्यादित कॉल करता येणार आहेत. याखेरीज पूर्वीच्या 300 एमबीऐवजी 500 एमबी डाटा मोफत दिला जाणार आहे. या दोन्ही योजना 16 मार्चपासून सुरू करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बीएसएनएलचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ग्राहकवर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नव्या योजनेचा फायदा बीएसएनएलच्या ग्राहकांना घेता येणार आहे. दरम्यान, बीएसएनएलने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या "स्टुडंट प्लॅन' योजनेतही बदल केला आहे. यात 148 च्या योजनेत आणखी 42 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर इतर नेटवर्कमध्ये मोफत संभाषण तसेच 2 जीबी डाटा मोफत मिळणार आहे. 

नेटवर्क सेवेत सुधारणा हवी... 
खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्याकरिता बीएसएनएल कंपनीने अमर्याद डाटा आणि कॉलची योजना जाहीर केली असली तरी बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये सतत व्यत्यय येत असतो. अनेक वेळा प्रयत्न करूनही फोन लागत नाहीत. तसेच रेंजमध्ये असतानाही ग्राहक नेटवर्कच्या बाहेर असल्याची टेप वाजवली जाते. त्यामुळे इतर कंपन्यांची स्पर्धा करताना बीएसएनएलने आपल्या नेटवर्क सेवेतही सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांतून आहे. 

Web Title: BSNL mobile companies competing