संघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा राष्ट्रवादीसाठी अवघड !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते मागील काही वर्षांपासून पक्षाच्या संदर्भात नाराज असल्याने त्यांना या यात्रेत आणण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे उभे टाकले आहे

मुंबई - शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावर राज्यभरात संघर्ष यात्रा काढणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची अखेरच्या टप्प्यातील संघर्ष यात्रा मंगळवारी, (16) मे रोजी सुरू होत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रानंतर ही संघर्ष यात्रा कोकणातील जिल्ह्यांमधून निघत असली तरी ही यात्रा राष्ट्रवादीसाठी अवघड असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये रायगडचा काही पट्टा वगळल्यास उर्वरित कोकणातील राष्ट्रवादीचे अनेक नेते, प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. यामुळे या संघर्ष यात्रेत या नाराजांचे मन वळविण्याचे सर्वात मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे. 

कोकणातील या संघर्ष यात्रेचा प्रवास रायगड ते बांद्यापर्यंत होणार आहे. याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड किल्यापासून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार असून त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्‍यांना पिण्याच्या पाण्याचा हक्‍क मिळवून दिलेल्या चवदार तळे येथेही एक अभिवादन सभा होणार आहे. त्यापुढे कोकणातील रत्नागिरी ते बांद्यापर्यंत ही यात्रा पोहोचेल. यादरम्यान, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याने या दरम्यान या यात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्‍वास आहे. मात्र त्यापुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते मागील काही वर्षांपासून पक्षाच्या संदर्भात नाराज असल्याने त्यांना या यात्रेत आणण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे उभे टाकले आहे. 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे कोकणातील दुसरे बडे नेते म्हणून ओळख असलेले भास्करराव जाधव हे अनेक महिन्यांपासून पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तर मुंबईत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडेही जाधव यांनी कानाडोळा केला होता. त्यातही त्यांचे मन वळविण्याचा बराच मोठा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावा लागल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे कोकणातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये शेखर निकम, अजित यशवंतराव, बाबाजी जाधव, संजय कदम हेही राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कोकणात सुरू होत असलेल्या या संघर्ष यात्रेत नाराजांना वळविण्यासाठी राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान असून त्यासाठी बरीच मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकणातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जात असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्याचे पूत्र आमदार नितेश राणे यांचे मन वळविण्यात यश मिळवले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कमी पडेल त्या ठिकाणी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या हाती संघर्ष यात्रेची धुराही दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.  

Web Title: challenge for NCP in Konkan