टोमॅटोपाठोपाठ हिरव्या मिरचीचा झटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

चिपळूण - श्रावणात वाढलेली मागणी व आवक कमी झाल्याने सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरव्या मिरचीने ग्राहकांना झटका दिला आहे. किरकोळ बाजारात दोन्हींचे भाव प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. इतर फळभाज्यांचे भाव ४० ते ५० रुपयांच्या जवळपास आहेत. पालेभाज्या तुलनेने स्वस्त आहेत. 

शेतकरी शेतीच्या कामात गुंतल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. या काळात भाज्या कमी प्रमाणात येतात. पावसामुळे त्याची काढणी करताना अडचणी येतात. जास्त पावसामुळे पालेभाज्यांवर विपरीत परिणाम होतो. तीन दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरू झाल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यातच मागणी व आवक याचे समीकरण बिघडले आहे. खेर्डीत बुधवारी आठवडा बाजार भरतो. आठवडा बाजारासह चिपळूण शहरातील बाजारपेठेत भाज्यांची आवक सुमारे २० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. येथील घाऊक बाजारातील भाव व किरकोळ बाजारातील भावांत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. काही भागांत किरकोळमध्ये टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये, तर हिरवी मिरचीची ८० ते ८५ रुपयांनी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात हा भाव साधारणपणे प्रति दहा किलोमागे अनुक्रमे ५०० ते ६५० आणि ३५० ते ४०० रुपये एवढा आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दरवर्षी भाज्यांचे भाव वाढतात. तरीही यावर्षी मागील महिन्यात पावसाने दिलेली ओढ आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

पालेभाज्यांचा दिलासा
फळभाज्यांचे भाव तेजीत असले तरी चांगली आवक असल्याने पालेभाज्यांचे भाव आवाक्‍यात आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीसह बहुतेक भाज्या १० ते १५ रुपये जुडी मिळतात. कांदा पातीचे भाव २० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.