परशुराम, कुंभार्ली घाटात वाढता धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

‘आपत्ती’ यंत्रणा सज्ज - दरडी कोसळल्‍याने चिपळूण-कराड मार्ग ११ तास ठप्प  
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम आणि चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. भूस्खलनाचे प्रकार लक्षात आल्यावर सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. 

‘आपत्ती’ यंत्रणा सज्ज - दरडी कोसळल्‍याने चिपळूण-कराड मार्ग ११ तास ठप्प  
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम आणि चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. भूस्खलनाचे प्रकार लक्षात आल्यावर सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. 

गेल्यावर्षी परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरडी कोसळून महामार्ग ठप्प झाला होता. परशुराम घाटातील ३ किमी लांबीचा रस्ता धोकादायक आहे. परशुराम गावापासून पुढील भाग कागदोपत्री महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येतो; मात्र घाटात एखादी घटना घडली, तर चिपळूण राष्ट्रीय महामार्ग उपविभागातील अधिकाऱ्यांना पळापळ करावी लागते. गुहागर-विजापूर मार्गाचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर झाल्यानंतर कुंभार्ली घाट कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. वेडीवाकडी वळणे असणाऱ्या या दोन्ही घाटात भूस्खलन वा दरडी कोसळतात. घाटातील नाले दगड-मातीने तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. कुंभार्ली घाटातील ६ किमीचा भाग धोकादायक बनला आहे.

गुहागर-चिपळूण-कराड-विजापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग झाला. तो हस्तांतरीतही करण्यात आला. कागदोपत्री प्रक्रिया झाली असली, तरी महामार्गावर एखादी आपत्ती आली तर जबाबदारी कोणाकडे, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. रविवारी (ता.२५) मध्यरात्री पोफळी-सय्यदवाडी येथे दीडशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून रस्त्यावर आले. त्यामुळे चिपळूण-कराड वाहतूक ठप्प झाली. विजेच्या तारा तुटल्यामुळे वाडीचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने कार्यवाही सुरू केली. कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,  तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक निशा जाधव व महावितरणचे शाखा अभियंता श्रीकांत काळे यांनी एकत्रित यंत्रणा कार्यान्वित केल्याने ११ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. वाडीतील निम्या घरांचा वीजपुरवठाही सुरळीत झाला.

परशुराम घाटात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीची यंत्रणाही येथे कार्यरत आहे. 
- एस. बी. मराठे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग-चिपळूण