मंडईसाठी ४० लाखांची आवश्‍यकता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

चिपळूण - भाजी मंडईच्या दुरुस्तीबाबत विक्रेत्यांनी सुचविलेल्या सुधारणा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मंडईच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी किमान ४० लाखांची आवश्‍यकता आहे. पालिका फंड किंवा पालिकेल्या प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून हा खर्च करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. 

चिपळूण - भाजी मंडईच्या दुरुस्तीबाबत विक्रेत्यांनी सुचविलेल्या सुधारणा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मंडईच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी किमान ४० लाखांची आवश्‍यकता आहे. पालिका फंड किंवा पालिकेल्या प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून हा खर्च करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. 

भाजी मंडईतील अंतर्गत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत मंडईतील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंडईची पाहणी केली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसणाऱ्या सर्व भाजी विक्रेत्यांना मंडईच्या परिसरात जागा उपलब्ध करून द्या. त्यासाठी जागेचा भराव करा, पत्र्याची शेड तयार करून मिळावी. मंडईत जाण्यासाठी समोरून प्रवेशद्वार अशा विविध मागण्या भाजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी सुधीर शिंदे यांनी केल्या होत्या. यातील शक्‍य असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन पालिकेतर्फे देण्यात आले. नगराध्यक्षा सौ. खेराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार किमान ४० लाखांचा निधी मंडईच्या दुरुस्तीसाठी लागणार आहे. मंडईची इमारत बांधून अनेक वर्ष झाली; मात्र लिलाव प्रक्रिया न झाल्यामुळे ही इमारत विनावापर पडून आहे. मंडई सुरू करण्यापूर्वी पालिकेला रंगरंगोटीसह अनेक कामे करावी लागणार आहेत. 

‘‘मंडई सुरू होणे आवश्‍यक आहे. किरकोळ दुरुस्ती आणि भाजी विक्रेत्यांनी सुचविलेल्या सुधारणा करण्यासाठी पालिकेच्या फंडातून निधी खर्च करा किंवा पालिकेल्या मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून ही कामे करता येईल.’’ 
- मोहन मिरगल, नगरसेवक शिवसेना

‘‘भाजी विक्रेत्यांना मंडईमध्ये हव्या असलेल्या सर्व सुधारणा केल्या जातील. सभागृहात याचा योग्य निर्णय होईल; परंतु लिलावात सहभागी न होणे योग्य नाही. पालिका सहकार्य करण्यास तयार असल्यामुळे आता भाजी विक्रेत्यांनी लिलावात सहभागी होणे गरजेचे आहे.’’
- सौ. सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा