शहरात हॉटेल आणि कोल्ड स्टोअरेजला आग 

शहरात हॉटेल आणि कोल्ड स्टोअरेजला आग 

लाखोंचे नुकसान:  अडीच तासांनंतर आग आटोक्‍यात 
रत्नागिरी : शहरात आज वेगवेगळ्या दोन ठिकाणी आग लागली. उद्यमनगर एमआयडीतील आगीत मच्छी ठेवण्याचे कोल्ड स्टोअरेज खाक झाले, तर दुसऱ्या घटनेमध्ये हॉटेल कार्निव्हलच्या एक्‍झॉस्ट फॅनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच पोचून शर्थीचे प्रयत्न करीत दोन्ही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनांमध्ये पालिकेचे अग्निशमन कर्मचारी किती असुरक्षित असून यंत्रणेमध्ये किती दोष आहेत हे उघड झाले. 

मिरकरवाडा येथील रहिम अकबर अली यांनी आठ महिन्यांपूर्वी उद्यमनगर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक के 10 झेडमध्ये मासळी स्टोअरेज करण्याची यंत्रणा उभी केली होती. कोल्ड स्टोअरेजमधून मच्छी कडक करून ती अन्य ठिकाणी पाठविली जाते; मात्र आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रहिम यांच्या प्लॉटच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेतील गवताला अज्ञाताने आग लावली होती. या वणव्याची झळ कोल्ड स्टोअरेजला बसली. आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांना समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. या वेळी कोल्ड स्टोअरेजच्या बाहेरील बाजूला ठेवलेले थर्माकोलचे साहित्य पेटले. संपूर्ण कोल्ड स्टोअरेजमध्ये पुठ्ठे असल्याने आग आटोक्‍यात आणणे कठीण झाले होते. पालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या बंबातील पाणी संपले. पुन्हा ते भरून आणण्यात आले. पुठ्ठ्यामुळे आग विझविताना अडथळे निर्माण झाले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आग आटोक्‍यात आणली. त्यानंतर फिनोलेक्‍सच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता आग आटोक्‍यात आली. ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये कोल्ड स्टोअरेजचे मोठे नुकसान झाले. 

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक शहरातील कार्निवल हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील एक्‍झॉस्ट फॅनच्या मोठ्या पत्र्याच्या तोंडातून प्रचंड धुराचे लोळ बाहेर पडू लागले. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ते दुसऱ्या मजल्यावर शिडी लावून चढले आणि पाणी मारून आग आटोक्‍यात आणली. सुमारे एक ते दीड तास आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. एक्‍झॉस्ट फॅनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून गॅस सिलिंडर बाहेर काढली. यामध्ये हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले. तसेच इन्व्हर्टरच्या बॅटरीदेखील वाचविण्यात यश आले. या वेळी आमदार उदय सामंत यांच्यासह नगराध्यक्ष राहुल पंडित, पाणी सभापती निमेश नायर, बंटी कीर आदी उपस्थित होते. 

अग्निशमन दलाची यंत्रणा अपुरी 

शहर आणि परिसरात आज दोन ठिकाणी आगीचे गंभीर प्रकार घडले; मात्र आग विझविण्यासाठी असलेल्या पालिकेच्या अग्निशमन दलामध्ये प्रचंड दोष पुढे आले आहेत. दलाचे कर्मचारी प्रामाणिकपणे जीव धोक्‍यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न करतात; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित साधनसामग्री नसल्याने कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात आहे. बंबाच्या पाईप ठिकठिकाणी फुटल्या आहेत. तीन मजल्यांपर्यंत आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यादृष्टीने पालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com