काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त गट स्थापन

काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त गट स्थापन

जिल्हा परिषद - गटनेतेपदी सावंत; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर्गत बंडखोरी अथवा दगा होऊ नये याची खबरदारी म्हणून आज काँग्रेसच्या २७ व राष्ट्रवादीचा एक अशा २८ सदस्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर सिंधुदुर्ग जिल्हा विकास व उन्नती गटाची स्थापना केली.

गटनेते म्हणून जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समिती सभापती-उपसभापतिपदाच्या निवडीची प्रक्रिया मंगळवारी झाली. आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली असून २७ सदस्य निवडून आणले आहेत.

जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच पदाधिकारी विराजमान होणार आहेत, हे निश्‍चित आहे. तरीही या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे २२ सदस्य निवडून आले आहेत. विरोधी गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यासह पदाधिकारी निवडीत सदस्यांकडून कोणताही दगाफटका होऊ नये याची खबरदारी काँग्रेस पक्षाच्यावतीने घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाचे २७ सदस्य व राष्ट्रवादीचा एक अशा २८ सदस्यांचा गट सदस्य सतीश सावंत (गटनेते) यांच्या नेतृत्वाखाली तयार केला. आज जिल्हाधिकाऱ्यांची या गटाला मान्यता घेण्यात आली. या वेळी सतीश सावंत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित २८ सदस्य उपस्थित होते.

निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. सावंत म्हणाले, ‘‘माझी गटनेतेपदी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचा आभारी आहे. जनतेला अपेक्षित काम करण्यासाठी सभागृहात एकसंधता राखली जाईल. चुकीचे काम होत असल्यास त्याला विरोध होणे चांगली बाब आहे; मात्र आपली जिल्हा परिषद जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करणार आहे. त्यामुळे सभागृहात विरोधासाठी विरोध होणार नाही याची खात्री आहे. जिल्हा परिषदेतील शिष्यवृत्ती घोटाळ्याकडे शिक्षणमंत्र्यांनीच लक्ष दिले नाही. त्यामुळे काही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्रयत्न सुरू राहतील.’’

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मिळालेली ही सलग पाचवी संधी आहे. जिल्हा परिषदेने चांगले काम केले; मात्र विरोधकांनी उगाचंच खोटे आरोप केले. ते आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे जनतेला काँग्रेस चांगले काम करत असल्याची खात्री पटली आहे. परिणामी काँग्रेसला पुन्हा संधी मिळाली.
- सतीश सावंत, गटनेते, जिल्हा परिषद
 

कोणाला संधी?
जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. याचा निर्णय काँग्रेस नेते नारायण राणे घेणार आहेत. या वेळी सावंतवाडी तालुक्‍यातील सदस्याला अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास जिल्हा परिषद सदस्य रेश्‍मा सावंत यांचे नाव पुढे येऊ शकते. सरोज परब, संजना सावंत अशा अनुभवी सदस्यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात राणे आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी निवड करण्याची शक्‍यता आहे. ते चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना संधी देणार की धक्कातंत्र वापरणार, हे येत्या २१ तारखेलाच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com