स्टेट बॅंक वगळता गर्दी ओसरली

kankavali-atm
kankavali-atm

कणकवली - बॅंकांतून पैसे बदलणे, भरणा करणे आणि एटीएममधून रक्‍कम काढणे यासाठी होणाऱ्या अलोट गर्दीचा जोर ओसरला आहे. स्टेट बॅंकांमध्ये रांगा लागत असल्या तरी इतर बॅंकांमधील कामकाज पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले आहे. तर अर्ध्या दिवसासाठी एटीएम यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. मोठी रोकड हाती नसल्याने जमिनीची खरेदी-विक्री, घरबांधणी, रस्ता खडीकरण-डांबरीकरण आदी कामे मात्र थांबली आहेत.

सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी या आठवड्याची सुरवात सुसह्य ठरली. पैसे जमा करण्यासाठी, काढण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे एवढाच कालावधी द्यावा लागत होता. यात बॅंकांचा सर्व्हर डाऊन असणे, तसेच पाचशे आणि हजाराच्या नोटांसाठी स्वतंत्र स्लिपा तयार कराव्या लागत असल्याने ग्राहकांचा वेळ जात होता.
सद्यःस्थितीत औषध विक्री दुकाने, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी यामध्ये जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. इतर ठिकाणी मात्र जुन्या पाचशे-हजार नोटा स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. पैसे बदलणाऱ्या ग्राहकांच्या बोटाला शाई लावली जाणार असल्याने अनेकांनी आर्थिक व्यवहारांवेळी धास्ती घेतली होती. परंतु अद्याप शाई लावण्याची सुरवात कुठल्याच बॅंकामध्ये झाली नसल्याचे दिसून आले. किंबहुना शाई लावण्याबाबतचे निर्देश आले नसल्याचीही माहिती बॅंकांकडून देण्यात आली.

चलनात पाचशेच्या नव्या नोटा दाखल झाल्या आहेत. मात्र सिंधुदुर्गातील ग्राहकांना त्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काही प्रसारमाध्यमांनी पाचशेच्या नोटा जिल्ह्यातील बॅंकांमधून दिल्या जाणार असल्याची अफवा पसरविली होती. सध्या दोन हजारच्या नोटा दिल्या जात असल्या तरी, या नोटा सुट्टे होण्याइतपतच चलन बाजारपेठांत नाही. त्यामुळे पाचशेच्या नोटा मिळविण्यासाठी आजही अनेक ग्राहकांनी बॅंकांचे उंबरठे झिजविले होते. परंतु अद्याप पाचशेच्या नोटा आल्या नसल्याची माहिती बॅंकांकडून देण्यात आली. नव्या चलनी नोटांसाठी एटीएम यंत्रांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रणालीमध्ये बदल केला जाणार आहे. त्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत जेवढ्या शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील, तेवढ्या विविध बॅंकांच्या एटीएममध्ये भरल्या जात आहेत. रात्री नोटा भरल्यानंतर दुपारपर्यंत त्या संपून जात आहेत. त्यामुळे बहुतांश बॅंकांची एटीएम दुपारपर्यंतच सुरू राहत आहे. यात सकाळच्या सत्रात एटीएमसमोर देखील ग्राहकांच्या रांगा दिसून 
येत आहेत.

बांधकाम, जमीन विक्रीवर परिणाम
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारावर फारसा परिणाम झाला नसल्याची चर्चा व्यक्‍त होत आहे. मात्र घरांची दुरुस्ती, नवीन घर बांधणी, जमिनी, फ्लॅट यांची खरेदी आणि विक्री प्रक्रिया मात्र पूर्णतः ठप्प झाली आहे. बाजारपेठांत पाचशे, हजारच्या नोटांचा मुबलक पुरवठा झाल्यानंतर मात्र मोठ्या आर्थिक रक्‍कमेचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com