डेब्रीजखाली कोंडला आझाद मैदानाचा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

दापोली - शहराचा मानबिंदू आणि जिल्ह्यातील सर्वात मोठे मैदान म्हणून ओळख असलेले ब्रिटिशकालीन आझाद मैदान सध्या डेब्रीजच्या विळख्यात सापडले असून या ढिगाऱ्याखाली मैदानाचा श्वास कोंडत चालला आहे.

दापोली - शहराचा मानबिंदू आणि जिल्ह्यातील सर्वात मोठे मैदान म्हणून ओळख असलेले ब्रिटिशकालीन आझाद मैदान सध्या डेब्रीजच्या विळख्यात सापडले असून या ढिगाऱ्याखाली मैदानाचा श्वास कोंडत चालला आहे.

शहरातील आझाद मैदानात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नैसर्गिक प-यामुळे दोन वर्षांपूर्वी येथे खड्डा झाला होता. हा खड्डा बुजवण्यासाठी येथे डेब्रीजचा भराव टाकून खड्डा भरून काढण्याचे काम करण्यात आले; मात्र येथील खड्डा भरल्यानंतर जुन्या इमारती पाडून देणाऱ्या ठेकेदारांनी अनधिकृतरीत्या येथे डेब्रीजचे डंपिंग गेली दोन वर्षे सुरू आहे. याबाबत नगरपंचायतीजवळ संपर्क साधला असता, अशाप्रकारे अनधिकृतपणे डेब्रीज टाकल्याचे आढळल्यास तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

आझाद मैदानाच्या रक्षणासाठी नगरपंचायतीकडून दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच संरक्षक भिंत बांधण्याला सभागृहाने देखील अनुकूलता दर्शवली होती. यानंतर प्रसारमाध्यमांनी याबाबत आवाज उठवला होता. या वृत्ताची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दापोली दौऱ्यात मैदानाची पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्यास अनुकूलता दर्शवली होती. ऐतिहासिक वारसा असलेल्या या मैदानाला सद्यःस्थितीत शहर आणि परिसरातील होणाऱ्या बांधकामांचे निरुपयोगी साहित्य डंपिंग करण्याचे हक्काचे ठिकाण ठेकेदारांनी बनवले आहे. गतवर्षी नगरपंचायत प्रशासनाने याठिकाणी सूचना फलक लावून दंडाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते; मात्र नगरपंचायत प्रशासनाला अनधिकृतपणे डंपिंग करणारे डेब्रीजवाले जुमानत नाहीत. हे प्रमाण वाढत चालले आहे. आझाद मैदान विद्रूप करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.