धोकादायक ४८ शाळांत विद्यार्थी गिरवताहेत धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

संगमेश्‍वर तालुक्यातील स्थिती - निधी उपलब्ध होऊनही दुरुस्ती होऊ शकली नाही

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील ४८ प्राथमिक शाळा विविध कारणांनी नादुरुस्त झाल्या आहेत. या शाळांना यावर्षी दुरुस्तीसाठी मंजुरीही मिळाली आहे. यासाठी शासनाकडून ४५ लाख ७४ हजार ७४३ रुपये निधी प्राप्त होऊनही शाळांची डागडुजी होऊ शकली नाही. यामुळे ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.

तालुक्‍यातील मांजरे कळकदेकोंड, फुणगूस-कातळवाडी, डिंगणी-बागवाडी, बामणोली, पांगरी क्र.१, घाटीवळे कदमवाडी, वांझोळे-गवळीवाडी, साखरपा क्र. २, मुर्शी-धनगरवाडी, तिवरे तर्फे देवळे, दाभोळे क्र.२, मुचरी घोटलवाडी, मुर्शी क्र. १, दाभोळे-धनगरवाडी,  पुर्ये तर्फे देवळे, तुळसणी क्र. १, दाभोळे-सोनारवाडी, कोंडगाव बाईंगवाडी, साखरपा-गोवरेवाडी, दाभोळे-बहुलवाडी, चाफवली-बौद्धवाडी, मोर्डे क्र. १, करजुवे क्र. १, देवळे क्र. १, किरबेट ओझरवाडी, पाटगाव केंद्र शाळा, मेढे तर्फे फुणगूस, तिवरे-पवारकोंड, देण, उमरे-बसवणकरवाडी, असुर्डे-मनवेवाडी, भिरकोंड, कळंबस्ते-मलदेवाडी, परचुरी क्र. ३, राजवाडी सुवरेवाडी, पुर्ये तर्फे देवळे, देवरूख क्र. १, कोसुंब फुगीची वाडी, भडकंबा पेठवाडी, काटवली क्र. १, देवडे क्र. २, तळेकांटे रेवाळेवाडी, मेढे तर्फे देवळे, मुरादपूर क्र. १, फणसवळे, धामणी क्र. २, देवरूख क्र.२  अशा एकूण ४८ शाळा विविध कारणांनी नादुरुस्त आहेत. यातील बहुतेक शाळांचे छपराचे काम आहे. काही शाळांच्या भिंतीची कामे बाकी आहेत. छपरातून होणाऱ्या गळतीमुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही सहन करावा लागत आहे. 

मुळात संगमेश्‍वर तालुक्‍यात ७० पेक्षा अधिक शाळा नादुरुस्त आहेत. त्यासाठी गेले २ वर्षे दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र त्यातील केवळ ४८ शाळांनाच मंजुरी देण्यात आली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना व जि. प. सेस फंडातून दुरुस्तीसाठी ४५ लाख ७४  हजार ७४३ इतका निधीही देण्यात आला. निधी मंजूर झाल्यावर शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळांची डागडुजी करणे गरजेचे होते; मात्र तसे न झाल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीतच धडे गिरवण्याची वेळ आली आहे. 

आधी प्रस्ताव, निधी उशिरा...
याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागात चौकशी केली असता दुरुस्तींचे प्रस्ताव आधी मंजूर झाले; मात्र पैसे उशिरा जमा झाले. परिणामी थोडक्‍या कालावधीत ही कामे होऊ शकली नाहीत. आता मोठ्या सुटीच्या कालावधीत ही कामे होतील असे सांगितलेे.